सिल्लोड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची कृषीमंत्री सत्तारांकडून पाहणी; नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश
Unseasonal Rain: नुकसानग्रस्तांशी संवाद साधत चिंता करू नका, सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशा शब्दात मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
Unseasonal Rain: गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यातील (Marathwada) वेगवेगळ्या भागात सतत अवकाळी पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडताना पाहायला मिळतोय. तर शुक्रवारी (28 एप्रिल) रोजी देखील जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. तसेच सिल्लोड तालुक्यात देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतातील पिकांसह काही ठिकाणी घारांची पडझड झाली होती. तर बऱ्याच घरांची पत्रे उडाली होती. तर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज (29 एप्रिल) सिल्लोड (Sillod) तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांशी संवाद साधत चिंता करू नका सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशा शब्दांत मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
तातडीने उपाययोजना कराव्यात...
यावेळी, झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने शासनास अहवाल पाठविण्याचे निर्देश मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. बऱ्याच ठिकाणी विजेचे खंबे पडल्यामुळे काही गावांत वीज पुरवठा खंडित झाला. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, दोन दिवसांपासून पाऊस पडतो आहे. त्याअनुषंगाने आरोग्य विभागाने देखील दक्ष राहून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या. तर यावेळी त्यांनी सिल्लोड मतदार संघातील मंगरूळ, हट्टी, सासुरवाडा, खुल्लोड, निल्लोड, बाभूळगाव, गेवराई सेमी आदी भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.
शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी
दरम्यान, नुकसानीची पाहणी करीत असताना आज देखील विविध ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. आणखी दोन- तीन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची स्थिती कायम राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. तर झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे केले जाणार असल्याचे सत्तार म्हणाले.
शेतकऱ्यांनी मांडली व्यथा...
सिल्लोड तालुक्यात झालेल्या नुकसानीची कृषीमंत्री सत्तार यांनी आज पाहणी केली. यावेळी बांधावर पाहणीसाठी आलेल्या कृषीमंत्री यांच्यासमोर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पीक अक्षरशः आडवी झाली आहे. तर अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. तसेच काही ठिकाणी घरांची पत्रे उडून गेली असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी सत्तार यांच्यासमोर मांडल्या. सोबतच शासकीय मदत करण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या: