दिल्लीत गोंधळ, गल्लीत चर्चा; भाजपकडून आपच्या धोरणाआड मविआला टार्गेट, राज्यात मद्यविक्री धोरणाची फाईल ओपन होणार?
Maharashtra News: दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्रातही मद्यधोरणाची चौकशी होणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Maharashtra Politics : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) मातोश्रीवर भेट झाली. त्यानंतर दोनच दिवसात आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना (Manish Sisodia) अटक झाली. या सगळ्या घडामोडींवरुन आता राजकारण पेटलं आहे. मद्यविक्री धोरणावरुन भाजपच्या आशिष शेलारांनी मविआला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवालांनी 24 फेब्रुवारी 2023 रोजी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर दोनच दिवसात म्हणजे 26 फेब्रुवारी 2023 रोजी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांना अटक झाली. आता या दोन घटनांचा एकमेकांशी संबंध असण्याचे कारण म्हणजे आशिष शेलारांची प्रतिक्रिया आहे. ज्या पद्धतीने दिल्लीत मनीष सिसोदिया यांनी दारुवाल्यांवर खैरात केली. तशीच खैरात महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली असा आरोप आशिष शेलारांनी केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी सीबीआय चौकशीचीही मागणी केली. त्यामुळे दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्रातही मद्यधोरणाची चौकशी होणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मनीष सिसोदिया हे अटक झालेले आपचे पाचवे मंत्री
तर दुसरीकडे मद्य धोरणात बदल केल्याने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्म घेतलेला पक्ष अशी आम आदमी पक्षाची ओळख आहे. पण गेल्या काही काळांमध्ये आमदार ते मंत्री असे अनेक लोक वेगवेगळ्या आरोपांखाली अटक झाले आहेत. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. याआधी सोमनाथ भारती यांच्यावरही घरगुती हिंसाचाराचे आरोप होते. मनीष सिसोदिया हे अटक झालेले आपचे पाचवे मंत्री आहेत.
मनीष सिसोदिया यांच्या अटकेमागची कारणं काय?
नवं मद्यविक्री धोरण नोव्हेंबर 2021 मध्ये लागू करण्यात आले आहे. नव्या धोरणात मद्यविक्री प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. खासगी दुकानांवर मद्यविक्रीला सुरुवात करण्यात आली आहे. मद्यविक्रीसाठी दिल्लीची 32 झोनमध्ये विभागणी करण्यात आली. प्रत्येक झोनमध्ये 27 खासगी वेंडर्सची नेमणूक करण्यात आली. खासगी वेंडर्संना मद्यदर नियंत्रणाची परवानगी देण्यात आली. सर्वात महत्वाचं घरपोच दारुची परवानगी देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात ईडी आणि इतर यंत्रणांचीही नजर होती. सीबीआयनेही याबाबात कारवाईला सुरुवात केली होती.
आम आदमी पार्टी और महाविकास आघाडी सरकार की मद्य उत्पादकों के लिए लिकर पॉलिसी एक समान रही है। इसलिए मविआ सरकार की भी सीबीआय पुछताछ होनी चाहिए।@BJP4Mumbai @BJP4Maharashtra @AamAadmiParty#BudgetSession2023 #MahabudgetSession #Maharashtra #MaharashtraPolitics #AshishShelar pic.twitter.com/9h0YSgFo9F
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 28, 2023
सिसोदिया यांच्या अटकेचा घटनाक्रम
- 19 ऑगस्ट 2022 – सिसोदियांच्या घरी सीबीआयचा छापा
- 30 ऑगस्ट 2022 – सिसोदियांच्या बँक लॉकर्सची तपासणी
- 17 ऑक्टोबर 2022 – सीबीआयकडून नऊ तास चौकशी
- 25 नोव्हेंबर 2022– सीबीआय चार्जशीटमध्ये सिसोदियांचं नाव नाही
- 19 फेब्रुवारी 2023 – सीबीआयकडून सिसोदियांना पुन्हा समन्स
- 26 फेब्रुवारी 2023 – आठ तासांच्या चौकशीनंतर सिसोदियांना अटक
रविवारी आठ तासांच्या चौकशीनंतर सिसोदिया यांना थेट अटकच झाली. त्याआधी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचं सिसोदियांनी दर्शन घेतलं होतं. कथित मद्य घोटाळा प्रकरणातील ही काही पहिली कारवाई नाही.
आतापर्यंत किती जणांना अटक?
- पहिली अटक - 27 सप्टेंबर 2022- विजय नायर
- दुसरी अटक- 28 सप्टेंबर 2022 – समीर महेंद्रू
- तिसरी अटक – 9 ऑक्टोबर 2022 - अभिषेक बोइनपल्ली
- चौथी अटक – 26 फेब्रुवारी 2023- मनीष सिसोदिया
आप आणि भाजप वाद काही नवा नाही. काही दिवसांपूर्वी दिल्ली महानगरपालिकेतही त्याचा प्रत्यय आला होता. जुन्या वादात आता या कारवाईची फोडणी पडली आहे. या कारवाईला विरोध करत आपच्या कार्यकर्त्यांनी देशभर आंदोलन केलं. तर यंत्रणांच्या कारवाईवरुन संजय राऊतांनीही भाजपला टोला लगावला आहे.
एकीकडे 2024 ची लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. त्याचवेळी दिल्ली, पंजाब जिंकून राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा वाढत चाललेल्या आपभोवती कारवाईचा ससेमिराही वाढत चालला आहे. आधीच आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन तुरुगांत आहेत. आता मनीष सिसोदिया यांनाही अटक झाली. त्यामुळे आपकडून देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनंही केली. पण, त्याच अटकेनंतर सुरु झालेलं राजकारण कुठल्या वळणाला जाणार हे लवकरच कळेल.