Politics:'उद्धव ठाकरेंनी सांगितल्यास सातव्या मजल्यावरून उडी मारू' म्हणणारे भुमरेही नॉटरिचेबल
Maharshtra Politics: शिवसेना आमदार संदीपान भुमरे एकनाथ शिंदेंच्या सोबत असल्याची चर्चा.
Maharshtra Politics: राजकारणात कोण कधी काय करेल आणि कुठे जाईल यांचा नेम नसतो. आता असेच काही महाराष्ट्रातील राजकरणात घडताना पाहायला मिळत आहे. कालपर्यंत सोबत असणारे एकनाथ शिंदे रातोरात पक्षाचे 30 पेक्षा अधिक आमदार घेऊन गुजरातला गेले आहेत. विशेष म्हणजे कट्टर शिवसैनिक म्हणून समजले जाणारे अनेक आमदार आज उद्धव ठाकरेंच्या विरोधात असल्याचे दिसत आहे. तर 'उद्धव ठाकरेंनी सांगितल्यास सातव्या मजल्यावरून ही उडी मारू' असे म्हणणारे पैठणचे आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे आज एकनाथ शिंदेंच्या सोबत आहे.
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजप-शिवसेना यांच्यात सत्तासंघर्ष सुरु होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावून त्यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यांनतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी बोलताना शिवसेना आमदार भुमरे म्हणाले होते की, सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरे हे, जो आदेश देतील तो आदेश आमच्यासाठी अंतिम असेल. उद्धव ठाकरेंनी जर आम्हाला सातव्या मजल्यावरून उडी मारण्याचे आदेश दिले तर, ते ही करू अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिकिया दिली होती. मात्र आज तेच भुमरे एकनाथ शिंदेंच्या गटातील प्रमुख नेते समजले जात आहे. त्यामुळे राजकरणात कुणीच कुणाचं नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
औरंगाबादचे पाच आमदार...
एकनाथ शिंदे आणि 30 आमदार हे सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले आहे. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदारांचा सुद्धा समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. औरंगाबाद जिल्ह्यातील आमदारांच्या यादीत मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार, कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत,आमदार संजय शिरसाठ, वैजापूर आमदार रमेश बोरनारे हे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची चर्चा आहे
नाराज आमदार भाजपच्या संपर्कात...
राज्यातील राजकीय घडामोडींना मोठं वेग आला असून, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे 30 पेक्षा अधिक आमदारांना घेऊन गुजरातच्या एका हॉटेलमध्ये थांबले असल्याचे समोर आले आहे. त्यांनतर यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असताना, या सर्व प्रकरणावर आज सोक्षमोक्ष लागेल. तसेच नाराज आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं गौप्यस्फोट भाजपचे नेते तथा माजी मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे सावे हे फडणवीस यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक आहे.