Lightning Strike: मराठवाड्यात गेल्या दोन वर्षात 130 नागरिकांचा वीज पडून मृत्यू ; दहा वर्षात एकही वीजरोधक यंत्रांची खरेदी नाही
मराठवाड्यात 2020-2021 या दोन वर्षात 130 नागरिकांचा वीज पडून मृत्यू झाला असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे.
![Lightning Strike: मराठवाड्यात गेल्या दोन वर्षात 130 नागरिकांचा वीज पडून मृत्यू ; दहा वर्षात एकही वीजरोधक यंत्रांची खरेदी नाही maharashtra News Aurangabad seven killed in lightning strike in marathwada Lightning Strike: मराठवाड्यात गेल्या दोन वर्षात 130 नागरिकांचा वीज पडून मृत्यू ; दहा वर्षात एकही वीजरोधक यंत्रांची खरेदी नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/bd4594dcb8faf030951c882a1142685c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lightning Strike: पावसाळा तोंडावर असून त्यादृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे. असे असताना जिल्हा प्रशासनांच्या दुर्लक्षामुळे मराठवाड्यात दोन वर्षांत तब्बल 130 नागरिकांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मागील दहा वर्षांपासून एकाही नवीन वीजरोधक यंत्राची खरेदी करण्यात आली नसल्याचे सुद्धा समोर आलं आहे. त्यामुळे मराठवाड्याचा कारभार जुन्या 31 यंत्रांवरच भागवले जात आहे.
पावसाळा तोंडावर आला की, दरवर्षी मान्सूनपूर्व बैठक प्रशासनाकडून घेतल्या जातात.यावेळी आपत्ती निवारणासह अनेक सूचना करण्यात येतात. या बैठकीत वीज पडून होणारे मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना प्रत्येकवेळी दिल्या जातात. परंतु प्रत्यक्षात यावर हवं तशाप्रकारे अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यांनी आपत्ती व्यवस्थापन निधीतून मागणीनुसार वीजरोधक यंत्र खरेदी करणे बंधनकारक आहे. पण त्याचेही अंमलबजावणी होताना दिसत नाही. कारण गेल्या दहा वर्षात मराठवाड्यातील एकही जिल्ह्याने नवीन वीजरोधक यंत्र खरेदी केले नसल्याचे समोर आलं आहे.
दोन वर्षांत तब्बल 130 नागरिकांचा मृत्यू
एकीकडे दहा वर्षात मराठवाड्यात एकही वीजरोधक यंत्र खरेदी करण्यात आलं नसल्याचे समोर आले असताना दुसरीकडे गेल्या दोन वर्षात 130 नागरिकांचा वीज पडून मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मराठवाड्यात वीज पडून 2020 मध्ये 55 तर 2021 मध्ये 75 अशा एकूण 130 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. ज्यात 2020 मध्ये सर्वाधिक नांदेड जिल्ह्यातील 15 जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता. तर 2021 मध्ये सुद्धा सर्वाधिक 20 जणांचा मृत्य झालेले नागरिक नांदेड जिल्ह्यातीलच होते.
कोणत्या जिल्ह्यात किती यंत्र...
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात एकूण 31 वीजरोधक यंत्र आहेत. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यात 4, जालना 3,परभणी 4,हिंगोली 2, नांदेड 4,बीड 6,लातूर 4आणि उस्मानाबाद जिल्ह्यात 4 वीजरोधक यंत्र आहेत. त्यामुळे किमान यावर्षी तरी वीजरोधक यंत्र खरेदी करून नागरिकांचे जीव वाचवावे अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)