एकनाथ शिंदेंच्या पाठोपाठ 'या' आमदाराचीही चर्चा; 'एबीपी' माझाचा जुना व्हिडिओही व्हायरल
Politics: सोशल मीडियावर भुमरे यांचा व्हिडिओ मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे. सोबतच त्यांना ट्रोलही केले जात आहे.
Maharshtra Politics: एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर राजकीय घडामोडींना अधिकच वेग आला आहे. विशेष म्हणजे या सर्व घडामोडीचे किंग मेकर म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे बघितले जात आहे. मात्र असे असताना एकनाथ शिंदेंच्या पाठोपाठ शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांची सोशल मीडियावर मोठी चर्चा असून, त्यांना ट्रोल केलं जात आहे. सोबतच 'एबीपी माझा'चा एक जुना व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत असून, ज्यात 'उद्धव ठाकरेंनी सांगितल्यास सातव्या मजल्यावरून ही उडी मारू' असा दावा भुमरे करताना पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजप-शिवसेना यांच्यात सत्तासंघर्ष सुरु होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावून त्यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यांनतर एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी बोलताना शिवसेना आमदार भुमरे म्हणाले होते की, सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरे हे, जो आदेश देतील तो आदेश आमच्यासाठी अंतिम असेल. उद्धव ठाकरेंनी जर आम्हाला सातव्या मजल्यावरून उडी मारण्याचे आदेश दिले तर, ते ही करू अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिकिया दिली होती. मात्र आज तेच भुमरे एकनाथ शिंदेंच्या गटातील प्रमुख नेते समजले जात आहे.
सोशल मीडियावर भुमरे यांचा हा व्हिडिओ मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे. सोबतच त्यांना ट्रोलही केले जात आहे.
औरंगाबादचे पाच आमदार...
एकनाथ शिंदे आणि 30 आमदार हे सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले आहे. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदारांचा सुद्धा समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. औरंगाबाद जिल्ह्यातील आमदारांच्या यादीत मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार, कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत,आमदार संजय शिरसाठ, वैजापूर आमदार रमेश बोरनारे हे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची चर्चा आहे