Abdul Sattar: सत्तार म्हणतात मी 'सुरक्षित'; राजीनाम्याबाबत कृषिमंत्र्यांचं सूचक विधान
Aurangabad : औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला अब्दुल सत्तार यांनी आज हजेरी लावली.
Abdul Sattar On Resignation: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे चांगलेच अडचणीत सापडले आहे. राज्यभरातून होत असलेल्या टिकेनंतर सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी देखील मागितली आहे. मात्र विरोधकांकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची सतत मागणी केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, आता राजीनाम्याच्या मुद्यावरून खुद्द सत्तार यांनीच सूचक विधान केले आहे. मी 'सुरक्षीत' असल्याचं सूचक वक्तव्य सत्तार यांनी केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा राजीनामा घेण्याचे टाळले असावेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला अब्दुल सत्तार यांनी आज हजेरी लावली. यावेळी त्यांनी पीक विमा संबधित आढावा घेतला. तर पीक विमा कंपन्याचे अधिकारी देखील या बैठकीत हजर होते. दरम्यान बैठक संपल्यावर सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तर सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून राजीनामा देण्याची मागणी केली जात असल्याचा प्रश्नाला उत्तर देणं सत्तार यांनी टाळले. मात्र याचवेळी बोलतांना 'मी सुरक्षीत, मी सुरक्षीत' असं सूचक वक्तव्य सत्तार यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे सत्तार यांचा राजीनामा घेणार नसल्याची चर्चा पाहायला मिळू लागली आहे.
संजय राऊत यांना शुभेच्छा...
संजय राऊत यांची जामीन झाली असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, आता कोण कुठून बाहेर आला, कधी आला, कसा आला आणि कोण वाघ आहे हे बोलण्याची वेळ आज नाही. न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. प्रत्येक वाघाला पिंजऱ्यात ठेवण्याची गरज नाही. त्यांच्यावर झालेले आरोप खरे होते की खोटे याबाबत कोर्टाचा निकाल मी काही वाचला नाही. मात्र माध्यमांमधून कळाले की, त्यांची जामीन झाली आहे. त्यामुळे ते वाघ आहे की आणखी काय आहे यावर मी बोलणार नाही. मात्र त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले.
सत्तारांचे फुलांची उधळण करत स्वागत...
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया यांच्याबद्दल अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आले. अजूनही अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रत्यावर उतरतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान सर्वच स्तरातून होणाऱ्या टीका पाहता अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली आहे. पण अजूनही त्यांच्या राजीनाम्याची मागणी कायम आहे. अशात औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या अब्दुल सत्तार यांचं कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. औरंगाबादच्या विश्रामगृहात आलेल्या अब्दुल सत्तार यांच्या अंगावर कार्यकर्त्यांनी गुलाबाच्या फुलाची उधळण केली. विशेष म्हणजे सत्तार यांनी देखील हसतमुखाने ते स्वीकारल्याचे पाहायला मिळाले.