...अन्यथा मीडिया ट्रायल करू नका, पीएफआयवरील कारवाईवर एमआयएमची पहिली प्रतिक्रिया
Imtiaz Jaleel: आपल्याकडे काही नसतांना उगीच लोकांना त्रास देत असतील तर हे चुकीच आहे.
NIA-ATS Raids On PFI: गेल्या आठवड्यात झालेल्या कारवायांनंतर आज पुन्हा देशातील अनेक राज्यांमध्ये पीएफआयच्या (PFI) ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहे. ज्यात दिल्लीसह आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर छापेमारी करत एनआयए-एटीएस पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या सर्व कारवाईवर पहिल्यांदाच एमआयएमने भूमिका मांडत प्रतिक्रिया दिली आहे. पुरावे असतील तर नक्की कारवाई करावी, अन्यथा उगाच मीडिया ट्रायल करू नका, असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले आहे.
एनआयए-एटीएस पथकाने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देतांना इम्तियाज जलील म्हणाले की, आम्हाला याबाबत जास्त बोलायचे नाही. एटीएस काम करत आहे. पुरावे असतील तर चौकशी केली पाहिजे, मात्र आपल्याकडे काही नसतांना उगीच लोकांना त्रास देत असतील तर हे चुकीच आहे. पुरावे असतील तर कार्यवाही करा, मात्र मीडिया ट्रायल करू नका असेही जलील म्हणाले आहे. तर यापूर्वी कारवाया करतांना संशयाच्या बळावर तरुणांना अटक केली आणि दहा वर्षानंतर ते निर्दोष सुटले. त्याच उत्तर कोण देणार आहे. अटक केलेल्या तरुणांचे नातेवाईक, आई-वडील माझ्याकडे येतात. मी त्यांना समजून सांगतो की, घाबरू नका मुलं निर्दोष असतील तर कारवाई होणार नाही. त्यामुळे पुरावे असतील तर कोणीही समर्थन करणार नाही, असे जलील म्हणाले.
मराठवाड्यातील या जिल्ह्यात कारवाई...
- औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातून आज 13 ते 14 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ज्यात मुनिर अहमद सलीम अहमद, मोहम्मद सबेर अब्दुल खालेद, सैफुल्ल खान अब्दुल्लाह खान, (सर्व रा. जिन्सी परिसर) या तिघांचा समावेश आहे. इतर नावं अजून समजू शकले नाही. विशेष म्हणजे यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातून चार जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
- जालना: जालन्यात आज पीएफआयच्या माजी जिल्हाध्यक्षाला ताब्यात घेण्यात आले आहे. मोहम्मद सलमान खान (वय 24 वर्षेम रा. कन्हैयानगर,जालना) असे या तरुणाचे नाव आहे. आज पहाटे स्थानिक पोलिसांच्या मदतीने एटीएसच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. तर यापूर्वी सुद्धा जालना जिल्ह्यातून एकाला ताब्यात घेण्यात आले होते.
- परभणी: आज झालेल्या कारवाईत परभणी जिल्ह्यातून सुद्धा एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सय्यद कलीम सय्यद आजम असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. परभणी शहरातील उस्मानीया कॉलनी भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा परभणी जिल्ह्यातून 4 जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती.
- नांदेड: एटीएसने आज केलेल्या कारवाईत नांदेड जिल्ह्यातून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आबेद अली मोहंमद अली खान असे ताब्यात घेण्यात आलेल्या या तरुणाचे नाव आहे. ऑटोमोबाईल्सचे दुकान असलेल्या आबेद अलीला नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. तो गेली पाच वर्षे पीएफआयसाठी पूर्णवेळ काम करत होता.
महत्वाच्या बातम्या...
ऑपरेशन पीएफआय! मराठवाड्यातील औरंगाबादसह नांदेड, जालना-परभणीत आज पुन्हा एटीएसकडून छापेमारी