ऑपरेशन पीएफआय! मराठवाड्यातील औरंगाबादसह नांदेड, जालना-परभणीत आज पुन्हा एटीएसकडून छापेमारी
Aurangabad ATS Raids On PFI: स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने एटीएसने ही कारवाई केली आहे.
NIA-Maharashtra ATS Raids On PFI: गेल्या आठवड्यात एनआयए आणि एटीएसने कारवाई करत देशभरातून पीएफआयच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा एटीसने कारवाई करत राज्यभरातून 50 ते 55 पीएफआयच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ज्यात मराठवाड्यातील औरंगाबाद,नांदेड, जालना आणि परभणी येथील पीएफआयच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने एटीएसने ही कारवाई केली आहे.
आज सकाळीच औरंगाबाद,सोलापूर आणि नाशिकच्या मालेगावात एटीएसने छापेमारी करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून, काही ठिकाणी अटक सुद्धा करण्यात आली आहे. ज्यात मराठवाड्यातील औरंगाबाद येथून 13 ते 14 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी एटीएसने औरंगाबादच्या गुन्हे शाखेची मदत घेऊन रात्रभर कारवाई करत पीएफआयच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही प्रतिबंधकात्मक कारवाई आहे. तसेच यापूर्वी ज्यांना ताब्यात घेण्यात आले होते त्यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गुन्हे शाखेची मदत...
एटीएसने औरंगाबादमध्ये कारवाई करतांना स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेतली आहे. यावेळी गुन्हे शाखेचे वेगवेगळ्या पद्धतीने पथक तैनात करण्यात आले होते. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या पीएफआयच्या कार्यकर्त्यांचे पत्ते आणि फोटो गुन्हे शाखेच्या पथकाला देण्यात आले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे ही सर्व माहिती दिल्लीहून देण्यात आली होती.
संशयीतांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ठेवलं...
औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आलेल्या पीएफआयच्या कार्यकर्त्यांना शहारतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. ज्यात सिटी चौक पोलीस ठाण्यात 5 जणांना ठेवलं आहे, तर सिडको पोलीस ठाण्यात 8 जणांना ठेवले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. जर ही प्रतिबंधकात्मक कारवाई असेल तर त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे. मात्र पोलिसांनी काय कारवाई केली आहे, याबाबत अजूनही कळू शकले नाही.
औरंगाबादेत खळबळ...
गेल्या आठवड्यात औरंगाबाद येथून चार पीएफआयच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर देशविरोधात कट रचण्याचा आरोप ठेवत अटकही करण्यात आली होती. त्यातच आता पुन्हा एकदा पीएफआयच्या 13 ते 14 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ताब्यात घेण्यात आलेला नासेर शेख हा पीएफआयचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होता. त्यामुळे आता पीएफआयवरील कारवाईचं औरंगाबाद केंद्रबिंदू बनले असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या...