(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: पालकमंत्री भुमरेंचा तालुका अतिवृष्टी नुकसानभरपाईतून वगळला, शेतकऱ्यांमध्ये संताप
Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून एकूण 2, 68 कोटी 12 लाख 71 हजार 616 रुपये मिळणार आहे.
Aurangabad News: सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई (Heavy Rainfall Compensation) सरकारकडून वितरित करण्यात येत आहे. याचवेळी औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांचा पैठण मतदारसंघ (Paithan Constituency) मात्र अतिवृष्टी नुकसानभरपाईतून वगळण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोबतच वैजापूर तालुक्याला देखील यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळतोय.
सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने औरंगाबादसह मराठवाड्यात धुमाकूळ घातला होता. यावेळी जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालं. त्यानंतर प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. त्यानुसार आता सरकारकडून औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून एकूण 268 कोटी 12 लाख 71 हजार 616 रुपये वितरित करत आहे. विशेष म्हणजे नुकसानभरपाई देताना पैठण आणि वैजापूर या दोन्ही मतदारसंघाला वगळण्यात आले आहे.
तालुकानिहाय नुकसानभरपाई....
तालुका | बाधित शेतकरी | बाधित क्षेत्र | वितरीत निधी |
औरंगाबाद | 1215 | 8392 | 114131200 |
पैठण | 0 | 0 | 0 |
फुलंब्री | 21621 | 9417 | 128071200 |
वैजापूर | 0 | 0 | 0 |
गंगापूर | 45965 | 37119 | 535866200 |
खुलताबाद | 22929 | 15831 | 216172600 |
कन्नड | 57760 | 44866 | 635351800 |
सिल्लोड | 92640 | 40861.31 | 555713816 |
सोयगाव | 32980 | 36468 | 495964800 |
एकूण | 286010 | 192954.31 | 2681271616 |
शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप...
यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे जुलै महिन्यातच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ आली होती. त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. यामुळे पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. सोबतच वैजापूर तालुक्यात देखील पिकांना पावसाचा फटका बसला होता. मात्र असे असताना या दोन्ही जिल्ह्यांना नुकसान भरपाईतून वगळण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रशासन आणि सरकारविरोधात मोठा संताप पाहायला मिळतोय. तर विरोधकांनी या विरोधात आंदोलन करण्याची देखील भूमिका घेतली आहे.
शिंदे गटाची अडचण वाढणार?
पुढच्या महिन्यात जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहे. विशेष म्हणजे या सर्व निवडणुका संपूर्ण ग्रामीण भागात आहे. अशातच वैजापूर आणि पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईतून वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघाचे नेतृत्व सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार करतायत. त्यामुळे याचा फटका शिंदे गटाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.