(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: कोणी टाक्या तर कोणी डबे अन् घमेले घेऊन आले, पलटी झालेल्या टँकरमधून फुकटचे तेल घेऊन गेले
Aurangabad : समोरील वाहनाला वाचवण्याच्या नादात टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि तेलाने भरलेले हे टँकर रस्त्याखाली जाऊन उलटले.
Aurangabad News: रस्त्यावर एखांदा अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकजण मदतीला धावून येत असतात, मात्र काही ठिकाणी मदत सोडून वाहनातील वस्तू पळवण्यात आल्याच्या अनेक घटना घडत असतात. औरंगाबादच्या आडूळजवळ असलेल्या धुळे-सोलापूर महामार्गावर देखील असाच काही प्रकार पाहायला मिळाला आहे. औरंगाबादकडून बीडकडे गोडतेल (खाद्यतेल) घेऊन जाणारा टँकर उलटून अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मदत न करता टँकरमधून वाहून जाणारे तेल घेऊन धूम ठोकली. तर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही घटना मंगळवारी आडूळ येथील बाह्यवळणावर घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, औरंगाबादकडून बीडकडे (जी.जे. 12. बी. एक्स-6442) हा टँकर गोडतेल (खाद्यतेल) घेऊन जात होता. दरम्यान आडूळ येथील बाह्यवळणावर येताच समोर जाणाऱ्या वाहनचालकाने टँकरला हुलकावणी दिली. त्यामुळे समोरील वाहनाला वाचवण्याच्या नादात टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि तेलाने भरलेले हे टँकर रस्त्याखाली जाऊन उलटले.
गोडतेल पळवण्यासाठी तुफान गर्दी..
दरम्यान आडूळ येथील बाह्यवळणावर गोडतेल (खाद्यतेल) घेऊन जाणार टँकर पलटी झाला असल्याची माहिती काही क्षणात परिसरात पसरली. त्यामुळे या भागातील रजापूर, थापटी, आडूळ, देवगाव आदी आसपासच्या गावातील काही लोकांनी टॅकरच्या दिशेने धाव घेत तोबा गर्दी केली. प्रत्येकजण मिळेल ते भांडे, पाण्याच्या टाक्या, डबे, पाण्याचे जार, बादल्या तर कुणी पातेले घेऊन टॅकरच्या दिशेने धावत होते. फुकटचे तेल मिळविण्यासाठी जणू स्पर्धा लागली होती. प्रत्येकजण आपापली भांडी भरण्यात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. त्यातच काहींनी तर अक्षरशः वाहून जाणारे मातीमिश्रित तेलही भरून नेले.
व्हिडिओ व्हायरल...
गोडतेलाच टँकर पलटी झाल्याची माहिती मिळताच लोकं तेल घेऊन जाण्यासाठी अक्षरशः तुटून पडली होती. तेल नेण्याऱ्याच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे अगदी लहानग्यापासून वयोवृद्धांपर्यंत अन् पुरुषांपासून महिलांपर्यंत सर्वांनीच जास्तीचे तेल आपल्या भांड्यात कसे पडेल यासाठी कसरत करत होते. तर याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलच्या कॅमऱ्यात कैद केला.
पोलिसांची घटनास्थळी धाव...
आडूळ येथील बाह्यवळणावर गोडतेल (खाद्यतेल) घेऊन जाणार टँकर पलटी झाला असून, नागरिक तेल पळवून नेत असल्याची माहिती पाचोड पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, लोकांना हुसकावून लावले. तर या अपघाताच्या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मोठी बातमी! औरंगाबादेतील वैजापूर शहरातील चारचाकीच्या शोरूमला भीषण आग