मोठी बातमी! महिलेची छेड काढणाऱ्या औरंगाबादच्या एसीपी विशाल ढुमेंचं अखेर निलंबन
Aurangabad Crime News: निलंबन असेपर्यंत ढुमे यांना औरंगाबाद शहर पोलिसांच्या पूर्वपरवानगी मुख्यालय सोडता येणार नसल्याचे देखील आदेश दिले आहे
Aurangabad Crime News: औरंगाबाद शहर पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त असलेल्या विशाल ढुमे (ACP Vishal Dhume) यांच्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांकडून यावरून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात होता. तर बुधवारपर्यंत ढुमे यांचे निलंबन न झाल्यास शुक्रवारी औरंगाबाद शहर बंद ठेवण्याची हाक खासदार इम्तियाज जलील यांनी दिली होती. त्यामुळे अखेर गृहविभागाने ढुमे यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश काढला आहे. तसेच निलंबन असेपर्यंत ढुमे यांना औरंगाबाद शहर पोलिसांच्या पूर्वपरवानगी मुख्यालय सोडता येणार नसल्याचे देखील आदेश दिले आहे.
एका ओळखीच्या व्यक्तीला घरी सोडण्याची विनंती करून, गाडीत बसल्यावर त्याच्या पत्नीचा ढुमे यांनी विनयभंग केला होता. एवढचं नाही तर पीडीत महिलेच्या पतीला बेदम मारहाण देखील केली होती. त्यामुळे महिलेच्या तक्रारीवरून शहरातील सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र अवघ्या चार तासात त्यांना जामीन मिळाला होता. मात्र त्यांच्यावर गृहविभागाकडून कोणतेही कारवाई होत नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. तर शुक्रवारी याविरोधात शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे वाढता संताप पाहता अखेर गृहविभागाकडून विशाल ढुमे यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्याबाबत गृहविभागाने लेखी आदेश देखील काढले आहे.
काय म्हटले आहे आदेशात?
गृहविभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, सहायक पोलीस आयुक्त विशाल शरद ढुमे यांच्याविरूध्द पोलीस ठाणे सिटी चौक येथे गुन्हा नोंद क्रमांक 0027/2023 अन्वये गुन्हा दाखल आहे. विशाल ढुमे यांचेविरुध्द फौजदारी गुन्ह्याबाबतचे प्रकरण अन्वेषनाधीन आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 मधील नियम 4 च्या पोटनियम (एक) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून याद्वारे उक्त विशाल शरद ढुमे (सहायक पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर) यांना उक्त नियमाच्या कलम 4 (1) (क) च्या तरतूदीनुसार दि. 16 जानेवारी 2023 पासून शासन सेवेतून निलंबित करण्यात येत आहे. सोबतच शासन आणखी असेही आदेश देत आहेत की, जोपर्यंत निलंबनाचे आदेश अस्तित्वात असतील तोपर्यंत विशाल ढुमे यांचे मुख्यालय पोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबाद शहर हे राहील. ढुमे यांना औरंगाबाद शहर पोलीस दलाचे आयुक्त यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. पोलीस आयुक्त यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांनी मुख्यालय सोडल्यास ती त्यांची गैरवर्तणूक ठरेल व त्या कारणासाठी वेगळ्या शिस्तभंगाच्या कारवाईस ते पात्र ठरतील, असा आदेशात म्हटले आहे.
सर्वत्र संतापाचे वातावरण!
आधीच शहरातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच एका मोठ्या अधिकाऱ्याकडूनच महिलेची छेड काढण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्यातच ढुमे यांच्या दादागिरीचा व्हिडिओ देखील समोर आला होता. त्यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर ढुमे यांना निलंबित करण्याची देखील मागणी केली जात होती. यासाठी काही संघटनांनी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांची देखील भेट घेतली होती. दरम्यान अखेर ढुमे यांचे निलंबन करण्यात आले आहे.
दानवेंची प्रतिक्रिया...
दरम्यान विशाल ढुमे यांच्या निलंबनाच्या आदेशानंतर अंबादास दानवे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. शहरातील एका महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे याला गृहविभागाने निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाऊन मी धाव घेतली होती.शिवसेना ही कायम आई बहिणींच्या संरक्षणासाठी कायम सज्ज असेल,असे दानवे म्हणाले.
शहरातील एका महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे याला गृह विभागाने निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाऊन मी धाव घेतली होती. शिवसेना ही कायम आई बहिणींच्या संरक्षणासाठी कायम सज्ज असेल. (१/२)
— Ambadas Danve (@iambadasdanve) January 18, 2023
संबंधित बातम्या: