Aurangabad: फटाके वाजवण्यावरून टोळक्याची तरुणाला बेदम मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
Aurangabad: या मारहाणीचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Aurangabad News: औरंगाबादच्या मुकंदवाडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, फटाके (Firecrackers) वाजवण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मुकंदवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणांनी संजयनगरमध्ये राहणाऱ्या एका मुलाला बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी मुकंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या मारहाणीचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकंदवाडी भागातील काही तरुणांचा आणि संजयनगरमध्ये राहणाऱ्या मुलाचा फटाके वाजवण्यावरून वाद झाला होता. वाद एवढा विकोपाला गेला की, आठ ते दहा जणांच्या टोळक्याने या एकट्या तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुण जखमी झाला आहे. तर मारहाण करणाऱ्या 10 जणांविरोधात मुकंदवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी मारहाणप्रकरणी आठ जणांना ताब्यात घेतले आहे.
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल...
फटाक्याच्या वादातून एका तरुणाला करण्यात आलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका मुलाला सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यात हा मुलगा खाली पडल्यावर त्याला लाथा-बुक्याने मारहाण केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तर एकाच्या हातात दगड असल्याचे देखील या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
फटाके अंगावर स्टंट...
दुसऱ्या एका घटनेत फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार परिसरातील खामगांव येथे दिवाळी साजरी करतांना काही तरुणांनी चक्क एकमेकांच्या अंगावर फटाके फेकण्याचा स्टंट केल्याचे समोर आले आहे. एकाचवेळी तरुणाचे तीन वेगवेगळे गट आमने-सामने आले आणि फटाके पेटवून एकमेकांच्या अंगावर फेकू लागले. याबाबत पोलिसांना महिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांची गाडी येताच तरुणांनी तेथून पळ काढला. या घटनेचा देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
फटाके फोडताना 16 मुलांना इजा...
औरंगाबाद जिल्ह्यात कालपासून वेगवेगळ्या घटनेत फटाके फोडताना 16 जणांना इजा झाली आहे. तर 6 रुग्णांवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ज्यात एका शहरातील मिसरवाडी भागातील 10 वर्षाच्या मुलाच्या चेहरा आणि डोळ्याला फटाके फोडताना इजा झाली आहे. त्याच्यावरही औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
धक्कादायक व्हिडिओ! तरुणांचा एकमेकांच्या अंगावर फटाके फेकण्याचा स्टंट; औरंगाबादमधील संतापजनक प्रकार