(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: अब्दुल सत्तारांच्या औरंगाबादेतील घरावर हल्ला करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
Aurangabad : औरंगाबादच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात 20 ते 22 कार्यकर्त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad News: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. काल सत्तार यांच्या मुंबईतील आणि औरंगाबादमधील घरावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत घराची तोडफोड केली. दरम्यान औरंगाबाद येथील घरावर हल्ला करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात औरंगाबाद शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. औरंगाबादच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात 20 ते 22 कार्यकर्त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काल सायंकाळी 5 वाजता अब्दुल सत्तार यांच्या रोजेबाग येथील घरावर काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अचानकपणे धडकले. यावेळी आलेल्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या घरावर दगडफेक केल्याने घराच्या काचा फुटल्या. तर आंदोलकांनी त्यांच्या घराचा गेट उघडून आतमध्ये घुसण्याचा सुद्धा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली होती. त्यानंतर या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर आता या सर्व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्यासह 20 ते 22 लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
यांच्यावर गुन्हे दाखल...
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्यासह शेख कय्युम अहमद, डॉ. मयुर मोहनराव सोनवणे, निलेश छगनराव राउत, अनुराग अप्पासाहेब पाटील शिंदे, अमित संजय त्रिवेदी, विठ्ठल जाधव, शुभम खत्रै, अजय साळवे, दादासाहेब काळे, दत्तासाहेब काळे, खाजा शरफोद्दिन मुल्ला, शाहरूख मोहम्मद खालेद, गणेश घुले, सुदर्शन बोडखे व इतर 4 ते 5 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल...
अब्दुल सत्तार यांच्या घरावर हल्ला करण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील क्रांती चौकात जोरदार निदर्शने केली होती. तर याचवेळी अब्दुल सत्तार यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून पुतळा जाळून घोषणाबाजी केली होती. त्यामुळे याप्रकरणी देखील शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या 20 ते 22 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजही आंदोलने...
औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात आज देखील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आले. वैजापूर येथे छत्रपती शिवाजी महराजांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करत घोषणाबाजी करण्यात आली. तर वाळूजच्या बजाजनगर चौकामध्ये सत्तार यांचा फोटो जाळून व जोडे मारून आंदोलन करण्यात आले.