Aurangabad: शरद पवारांचे 'ते' विधान म्हणजे हास्यास्पद; नामांतरावरून जलील यांची राष्ट्रवादीवर टीका
Aurangabad Renamed: औरंगाबादला येऊन स्पष्टीकरण देण्यासाठी शरद पवार यांना एवढा वेळ का लागला आहे,असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला.
Aurangabad News: औरंगाबादच्या नामांतराला विरोध करण्यासाठी उद्या औरंगाबादमध्ये भव्य असा मूक मोर्चा काढला जाणार आहे. त्यापूर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांवर निशाणा साधला आहे. मंत्रीमंडळात घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाबाबत मला कल्पना नव्हती असे पवारांचे विधान म्हणजे हास्यास्पद असल्याच जलील म्हणाले.
यावेळी बोलतांना जलील म्हणाले की, नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यापूर्वी याविषयी शिवसेनेच्या नेत्यांनी आधीच असा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत येणार असल्याची माहिती माध्यमांमध्ये दिली होती. त्यांनतर सुद्धा शरद पवार म्हणतात की, याबाबत आम्हाला माहित नव्हते. या कॅबिनेटच्या बैठकीत राष्ट्रवादीचे जयंत पाटील उपस्थित होते, राजेश टोपे, धनंजय मुंडे हेही उपस्थित होते. त्यामुळे औरंगाबादला येऊन स्पष्टीकरण देण्यासाठी शरद पवार यांना एवढा वेळ का लागला आहे. कारण त्यांना माहित होते की, हा जो निर्णय घेण्यात आला आहे तो लोकांना पटलेला नाही, असे जलील म्हणाले.
काँग्रेसचे नेते उद्या भाजपमध्ये दिसतील...
आज काँग्रेस पक्षाचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले हे म्हणत आहे की, जे झालं आहे ते झालं आहे. त्यामुळे आमचं आज असं मत झाले आहे की, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे कधी भाजपमध्ये जातील सांगता येत नाही. कारण याबाबत फक्त एक औपचारिक घोषणा बाकी राहिलेली आहे. त्यांना माहित आहे की, महाराष्ट्रात आता पुन्हा काँग्रेसची सत्ता येणार नाही. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये जाण्याचं ठरवलेलं असल्याच जलील म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर निशाणा...
यावेळी बोलतांना जलील म्हणाले की, भाजप-शिवसेनेची सत्ता होती, त्यावेळी का या दोन्ही पक्षाने नामांतराचा निर्णय घेतला नाही. मात्र आता याचे श्रेयं आपल्याला मिळावे म्हणून, जाता-जाता उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याची टीका जलील यांनी केली. याचवेळी त्यानीं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा निशाणा साधला.