Political War: खैरे यांच्याकडे आम्ही 'करमणूक' म्हणून पाहतो; जलील यांचा खोचक टोला
भाजपकडून एमआयएमने लोकसभा निवडणुकीत एक हजार कोटी घेतल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता.
Imtiaz Jaleel On Chandrakant Khaire: लोकसभा निवडणुकीत भाजपकडून वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला एक हजार कोटी रुपये देण्यात आले होते, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी उत्तर दिले आहे. भाजपने आम्हाला एक हजार कोटी नव्हे दहा हजार कोटी दिले होते. खैरेंना विश्रांती हवी होती म्हणून शिवसेना-भाजपने मला विजयी करण्यासाठी दहा हजार कोटी रुपये दिले होते. खुद्द खैरे यांनी हे पैसे आणून दिले होते, मात्र त्यातील दोन हजार त्यांच्याकडे शिल्लक असून ते कधी परत करणार याची वाट पाहत असल्याचा खोचक टोला जलील यांनी लगावला. तर खैरे यांच्याकडे आम्ही 'करमणूक' म्हणून पाहतो असेही जलील म्हणाले.
यावेळी बोलताना जलील म्हणाले, चंद्रकांत खैरे यांना आम्ही एन्जॉय करतोय. खैरे हे औरंगाबादसाठी एंटरटेनमेंट फॅक्टर झाले आहेत. जेव्हा खैरे बोलायला सुरवात करतात तेव्हा लोकं एंटरटेनमेंट घेतात. त्यामुळे मी कधीही त्यांना महत्वाचं समजलं नाही. एक हजार कोटी रुपये दिल्याचे आरोप करणाऱ्या खैरेंनी ईडीला पत्र लिहून भाजपकडे हे पैसे कुठून आले होते याची चौकशी करण्याची मागणी करावी, असेही जलील म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या सभेवर टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 8 तारखेला होणाऱ्या सभेवरून जलील यांनी शिवसेना-भाजपवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगावे की औरंगाबाद शहराला पाणी कधी मिळणार. ठाकरे यांनी याची घोषणा 8 तारखेच्या सभेत करावी, त्यांनी पाण्याची घोषणा केल्यास मी स्वतः त्यांचा जाहीर सत्कार करेल असं जलील म्हणाले. शहराला पाणी मिळणार नाही म्हणून पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा समोर काढला जाणार आहे. सभा फक्त सुरवात असणार त्यांनतर त्यांचे येथील कार्यकर्ते धंद्याला लागतील, असेही जलील म्हणाले.
शब्द मागे घेतो...
प्रकाश आंबेडकर यांच्यावर झालेल्या आरोपानंतर वंचित बहुजन आघाडीकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. खैरे यांनी माफी मागावी अन्यथा काळे फासण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला होता. त्यांनतर आता खैरे यांनी एक पाऊल मागे घेत प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं विधान आपण परत घेत असल्याचं म्हटल आहे. मात्र एमआयएमवर केलेल्या आरोपावर मात्र आपण ठाम असल्याचं खैरे म्हणाले आहे.