धक्कादायक! गावातील व्यक्तीच्या छेडछाडीला कंटाळून महिलेची आत्महत्या, शेतातील झाडाला गळफास लावून घेतला
Aurangabad: याप्रकरणी पैठण पोलिसात महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील गोपेवाडी येथील एका विवाहित महिलेने गावातील व्यक्तीच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली आहे. या महिलेने शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, परिसरात खळबळ माजली आहे. पल्लवी रवींद्र झाडे (वय 26 , रा. गोपेवाडी, ता. पैठण) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
मृत महिलेचा पती रवींद्र झाडे यांनी पैठण पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या गोपेवाडी गावातील प्रशांत बाबासाहेब खराद (वय 30 वर्षे) हा त्यांच्या पत्नीची छेडछाड करत होता. त्यामुळे खराद याच्या छेडछाडीला कंटाळून पल्लवी झाडे यांनी शेतातील विहिरीजवळील चिंचेच्या झाडाला साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची तक्रार रवींद्र झाडे यांनी दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी पैठण पोलिसात नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात
महिलेने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पैठण पोलीस ठाण्याचे पोलिस निरक्षक किशोर पवार यांनी आरोपी प्रशांत खराद याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला ताब्यात घेतले आहे. तर मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पैठण शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
हात धुण्यासाठी गेलेली चिमुकली हिटर लावलेल्या पाण्यात पडली; उपचारादरम्यान अखेर मृत्यू
शिक्षकाने केला विनयभंग...
दुसऱ्या एका घटनेत जालना औरंगाबाद प्रवासादरम्यान एका शिक्षकाने सहप्रवासी तरुणीच्या दंडाला हात लावून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. सचिन सुधाकरराव महाजन (वय 47 वर्षे, रा. मोरया पार्क, टीव्ही सेंटर) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, तो फुलंब्री तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय पीडिता पंचायत समिती सदस्य आहे. त्यांचे औरंगाबादेतही घर आहे. दरम्यान 23 नोव्हेंबरला कामानिमित्त त्या चनेगाव (ता. बदनापूर) येथे गेल्या होत्या. तेथील काम आटोपल्यानंतर रात्री 11.45 वाजता त्या जालना बसस्थानकाहून शिवशाही बसमध्ये बसल्या. याचवेळी आरोपी शिक्षक सचिन पीडितेजवळच्या सीटवर बसू लागला. पीडितेने त्याला तेथे बसू न देता पूर्ण बस रिकामी आहे, तुम्ही मागे बसा, असे सुचविले. त्यानंतर महाजन हा पाठीमागील सीटवर बसला. दरम्यान आरोपीने पीडितेशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळात पीडितेला झोप लागली.
पोलिसात गुन्हा दाखल...
पीडितीला झोप लागताच आरोपी सचिनने आसनाच्या फटीतून पीडितेच्या दंडाला दोन ते तीनवेळा हात लावून विनयभंग केला. त्यामुळे मध्यरात्री 12.45 वाजता बस सिडको बसस्थानकात येताच, तरुणीला घेण्यासाठी आलेल्या वडीलांना तिने घडलेला प्रकार सांगितला. तसेच डायल 112 ला कॉल करून पोलिसांना बोलावून घेतले. त्यानंतर सिडको पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.