हात धुण्यासाठी गेलेली चिमुकली हिटर लावलेल्या पाण्यात पडली; उपचारादरम्यान अखेर मृत्यू
Aurangabad : घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास चिमुकलीचा मृत्यू झाला.
Aurangabad News: औरंगाबादच्या वाळूज भागातील कमळापूर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, हिटर लावलेल्या बादलीतील गरम पाण्यात पडून 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. घरातील जिन्याखाली असलेल्या नळावर हात धुण्यासाठी गेली असता या चिमुकलीचा तोल गेल्याने ती गरम पाण्यात पडली. दरम्यान तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास मृत्यू झाला. श्रेया राजेश शिंदे (वय 4 वर्षे, रा.साईनगर, कमळापूर) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश शिंदे हे आपल्या पत्नीसह दोन मुली आणि आई-वडिलांसह कमळापूर येथील साईनगरात वास्तव्यास आहेत. दरम्यान त्यांची माहेरी गेल्या असल्याने मुलगी श्रेया आजी-आजोबांसह आपल्या वडिलांसोबतच थांबली. तर बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राजेश शिंदे हे कामावरून घरी परतले. तर कामावरून आल्याने त्यांनी अंघोळ करण्यासाठी जिन्याखाली असलेल्या बादलीत पाणी गरम करण्यासाठी हीटर लावले.
पाय घसरल्याने बादलीत पडली...
पाणी गरम होत आहे , तोपर्यंत मुलीला जेवू घालू म्हणून त्यांनी चिमुकली श्रेयाला सोबत घेऊन जेवण केले. तर जेवण झाल्यानंतर श्रेया ही हात धुण्यासाठी जिन्याखाली असलेल्या नळावर गेली. पण याचवेळी तिचा तेथे तोल गेला आणि ती हीटर लावलेल्या बादलीत पडली. श्रेयाच्या ओरडण्याचा आवाज आल्याने राजेश शिंदे यांनी पटकन घराबाहेर धाव घेतली. जिन्याजवळ येताच त्यांना श्रेया हीटर लावलेल्या बादलीत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी तिला बादलीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना विजेचा शॉक लागल्याने ते दूर फेकले गेले. त्यानंतर त्यांनी हीटरचे बटण बंद करून श्रेयाला बादलीतून बाहेर काढले.
अखेर प्राणज्योत मालवली..
शिंदे यांनी श्रेया हिला गंभीर भाजलेल्या अवस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
परिसरात हळहळ...
चार वर्षाची श्रेया गरम पाण्यात पडल्याची माहिती परिसरातील नागरिकांना कळताच अनेकांनी दुःख व्यक्त केले होते. तर तिच्यावर उपचार सुरू असतांना ती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना केली जात होती. मात्र शुक्रवारी सकाळी श्रेयाचा मृत्यू झाल्याची बातमी येऊन धडकली. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या अनेकांनी हळहळ व्यक्त केली. तर काहींनी शिंदे कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला.
Measles Disease : औरंगाबाद जिल्ह्यातही गोवरची एन्ट्री, दोन बालके पॉझिटिव्ह; प्रशासन अलर्टवर