Aurangabad: आज मुख्यमंत्री घेणार पाणीटंचाईचा ऑनलाइन आढावा; प्रशासनाची धावपळ
Aurangabad Water Issues: मुख्यमंत्री शहरातील पाणी प्रश्नाचा आढावा घेणार असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.
Aurangabad Water Issues: हातात दंडुका घेऊन औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न मिटवा अशा सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8 जूनला जाहीर सभेत अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यांनतर आज पुन्हा मुख्यमंत्री शहरातील पाणीटंचाईचा ऑनलाइन आढावा घेणार आहे. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे. त्यातल्या त्यात प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या असल्या तरीही प्रत्यक्षात लोकांच्या नळापर्यंत अजूनही सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकला नसल्याचे चित्र आहे.
औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न आतापर्यंत राज्यात गाजत असताना राज्यपालांनी शहरातील पाणी प्रश्न थेट राष्ट्रीय पातळीवर नेला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच औरंगाबादचा पाणी प्रश्न मिटवू शकतात असेही राज्यपाल म्हणाले. त्यामुळे शिवसेनेसाठी आता पाणी प्रश्न आणखीच महत्वाचा बनला आहे. आमचेच हिंदुत्व खरे हे सांगण्यासाठी औरंगाबादेत घेतलेल्या सभेत मुख्यमंत्र्यांना पाण्याविषयी बोलावे लागले होते. मुख्यमंत्री सुद्धा औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून गंभीर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजच्या आढावा बैठकीत अधिकारी काय भूमिका मांडणार आणि मुख्यमंत्री यावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजून घरापर्यंत येईना....
खुद्द मुख्यमंत्री यांनी शहरातील पाणी प्रश्नात लक्ष घातल्याने प्रशासन खडबडून जागे झालं. त्यांनतर विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त आणि खुद्द जिल्हाधिकारी रस्त्यावर उतरले. अनेक उपयोजना सुरु केल्या. पण 64 एमएलडीची (दशलक्ष लिटर) तूट भरून काढणे कठीण आहे. सध्या औरंगाबादला दररोज किमान 200 एमएलडी पाणी लागते. त्यामुळे प्रशासनाची धावपळ सुरु असली तरीही अजूनही नागरिकांच्या घरापर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकला नसल्याचे चित्र आहे.
भाजप आक्रमक...
आगामी महानगरपालिका निवडणुका पाहता भाजपकडून पाण्याच्या प्रश्नावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणूनच पाणी प्रश्नावरून भाजप आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. भाजपकडून स्थानिक पातळीवर सतत आंदोलन केले जात आहे. तर काही दिवसांपूर्वी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा 'जल आक्रोश मोर्चा' काढण्यात आला होता.