(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis Ministry: फडणवीसांच्या मंत्रीमंडळात एकट्या औरंगाबादला चार मंत्रिपद?
Aurangabad News: बंडखोर आमदारांमध्ये सर्वाधिक चर्चा औरंगाबाद जिल्ह्यातील आमदारांची होती.
Maharashtra Government Formation: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वेग आला आहे. तर आज संध्याकाळी सात वाजता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर फडणवीसांच्या मंत्रीमंडळाची संभाव्य यादी एबीपी माझाच्या हाती आली आहे. त्यानुसार एकट्या औरंगाबाद जिल्ह्याला चार मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यात संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, अतुल सावे यांच्या नावाची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर 35 पेक्षा अधिक आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत. मात्र यात सर्वाधिक आमदार औरंगाबाद जिल्ह्यातील होते. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातून संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, अतुल सावे,रमेश बोरणारे आणि प्रदीप जैस्वाल यांनी बंडखोरी केली होती. त्यापैकी आता मंत्रीमंडळाच्या संभाव्य यादीत संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, अतुल सावे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे एकट्या औरंगाबाद जिल्ह्याला चार मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
संध्याकाळी सात वाजता शपथविधी
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून आज संध्याकाळी सात वाजता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आज रात्री सात वाजता शपथ घेणार आहेत.
Marathwada: शिंदेंच्या बंडात 'मराठवाड्या'चा मोठा वाटा; बारापैकी आठ जण गुवाहाटीत
फडणवीस आणि शिंदे आज करणार सत्ता स्थापनेचा दावा
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. हे दोघेही साडेतीन वाजता राजभवनावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आत्ताच भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. एकनाथ शिंदे हे थेट गोव्याहून फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी पोहोचतील. त्यानंतर भाजपचे एक शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. आजच भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यामुळं आज रात्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबच शिक्कामोर्तब झाला आहे. आज राजभवनावर जाऊन देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकार बनवण्याचा दावा करतील. दरम्यान या पार्श्वभूमीवर राजभवन परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.