Marathwada: शिंदेंच्या बंडात 'मराठवाड्या'चा मोठा वाटा; बारापैकी आठ जण गुवाहाटीत
Politics:राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केल्याने शिवसेना आमदारांची नाराजी
Sehv Sena Marathwada: एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात शिवसेनेच्या तब्बल 35 आमदारांची त्यांना साथ मिळाली आहे. हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. मात्र शिंदेंच्या या बंडात 'मराठवाड्या'च्या मोठा वाटा आहे. कारण एकट्या मराठवाड्यातील शिवसेनेच्या 12 आमदारांपैकी 8 आमदार शिंदेंच्या सोबत आहे. विशेष म्हणजे यात दोन मंत्र्यांचा सुद्धा समावेश आहे.
शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिवसेना आमदारांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह औरंगाबाद पश्चिमचे संजय शिरसाट, औरंगाबाद मध्यचे प्रदीप जैस्वाल, वैजापूरचे रमेश बोरनारे, परंड्याचे तानाजी सावंत, उमरग्याचे ज्ञानराज चौगुले, नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर या आठ आमदारांचा समावेश आहे. तर दुसरीकडे उस्मानाबादचे कैलास पाटील, परभणीचे डॉ. राहुल पाटील, कळमनुरीचे संजय बांगर, कन्नडचे उदयसिंग राजपूत हे केवळ चार आमदार अजूनही शिवसेनेसोबतच असून मुंबईतील बैठकींना उपस्थित होते.
बालेकिल्ल्याला भगदाड....
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून औरंगाबादची ओळख आहे. याच औरंगाबादने चंद्रकांत खैरे यांना चार वेळा खासदार म्हणून निवडून दिले. वीस वर्षांपेक्षा अधिक काळ महानगरपालिकेची सत्ता सेनेकडे आहे. विधानसभा निवडणुकीत 9 पैकी 6 आमदार शिवसेनेचे निवडून आले. पण आता याच बालेकिल्ल्याला फक्त सुरुंग नव्हे तर भगदाड पडले आहे. कारण 6 आमदारांपैकी 5 आमदारांनी बंड पुकारले आहे.
भाजपचीच साथ हवी...
बंड करणाऱ्या बहुतांश आमदारांची नाराजी फक्त राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत केलेल्या युतीमुळे आहे. या दोन्ही पक्षामुळे शिवसेनेची हिंदुत्ववादी अशी असलेली ओळख पुसत चालली असल्याचा दावा अनेक आमदारांनी केला आहे. त्यात औरंगाबादच्या नामांतराला या दोन्ही पक्षातील नेत्यांचा होणारा उघड विरोध पाहता औरंगाबादमधील शिवसेनेच्या आमदारांमध्ये मोठी नाराजी होती. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपसोबतच सत्ता स्थापन करण्याची इच्छा बंड करणाऱ्या आमदारांची असून, आता ते उघडपणे समोर येत आहे.
शिवसेना रस्त्यावर
एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली आहे. अशात शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र याचवेळी राज्यातील शिवसैनिकांमध्ये मोठ संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे आज शिवसेनेकडून बंडाच्या विरोधात निदर्शने करून, शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. औरंगाबादच्या क्रांती चौकात सुद्धा शिवसैनिक मोठ्याप्रमाणावर जमा झाले होते. तर 'या गद्दरांचे करायचं काय खाली मुंडके वरती पाय' अशा घोषणा देण्यात आल्या.