गुप्तधनासाठी भाविकांच्या रक्ताचा अभिषेक, नांदेडमधील भोंदूबाबाला अटक
भोंदूबाबा अनेक वर्षांपासून अघोरी विद्या, तंत्रमंत्राचा वापर करत गुप्त धन काढून देणे, पैशांचा पाऊस, मटक्याचे आकडे काढून देणे, दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करत हजारो रुपये भक्ताकडून उकळत असे.
नांदेड : गुप्तधन, कुटंब भरभराटीसाठी चक्क भाविकांच्या रक्ताचा अभिषेक करणाऱ्या माहूरमधील भोंदूबाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. विश्वजीत कपिले असं आरोपी भोंदूबाबाचं नाव आहे. या भोंदुबाबाचा भांडाफोड बाबाच्या मुंबई येथील प्रविण शेरकर या भक्तानेच केला आहे.
भाविकांच्या रक्ताचा अभिषेक करणाऱ्या माहूर मधील विश्वजित कपिले या भोंदूबाबा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या भक्ताकडून 2013 ते 2020 पर्यंत रोख रकमेसह अनेक वस्तू असे 23 लाखाची फसवणूक बाबाने केली आहे. काल रात्री उशिरा या भोंदूबाबा सह चार जणां विरोधात माहुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा भोंदूबाबा अनेक वर्षांपासून अघोरी विद्या, तंत्रमंत्राचा वापर करत भूतबाधा घालवणे, गुप्त धन काढून देणे, पैशांचा पाऊस, मटक्याचे आकडे काढून देणे, दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करत हजारो रुपये भक्ताकडून उकळत असे. हा भोंदूबाबा स्वतःला दत्ताचा आवतार असल्याचे सांगून भक्ताकडून अघोरी पूजा करुन घेत असे. देवांना स्वतःचे आणि भक्ताचे रक्ताने अभिषेक करायला लावत असे. हजारो लोकं या बाबांचे भक्त असून हा बाबा स्वतःचीही पूजा आरती करुन अंगावर पैसे ठेवायला लावायचा. हा सर्व प्रकार अमावस्या पौर्णिमेच्या वेळेस करायचा.
भोंदूबाबा हा मूळचा पुसद जिल्हा यवतमाळचा आहे. सध्या नवरात्रोत्सव असल्याने माहुर येथे आपलं बस्तान मांडला आहे. दरम्यान या प्रकरणी भोंदूबाबा विश्वजीत कपिलेसह भाऊ रवि, कैलास आणि भावजय रसिका विरोधात माहुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोंदूबाबाने प्रविण शेरकरसह किती जणांची फसवणूक केली आता हे पुढे येईल. जादूटोणा कायदा येऊन अनेक वर्ष उलटली तरी भोंदूबाबाचे प्रमाण आजही कमी होताना दिसत नाही. श्रध्दा ठेवणाऱ्या लोकांची ही जगात कमी नाही हे देखील या निमित्ताने अधोरेखित होत आहे.
कपिले बाबाने अनेक भक्तांवर जे अघोरी प्रकार केलेत त्याचे अनेक व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. ज्यातून हा बाबा रक्ताभिषेक करणे, भूत बाधा,प्रेत बाधा, स्वतः च्या अंगावर पैसे ठेवणे, स्वतःची पूजा करून घेत असल्याचे व भोळ्या भाबडया लोकांवर विविध अघोरी प्रकार करत असल्याचे दिसत आहे.