(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एकाच गावात कोरोनाचे 188 रुग्ण, तीन मृत्यू; मोठी किंमत मोजल्यानंतर लोकांमध्ये जागरुकता
कोरोना संसर्ग अनुभवलेल्या लातूरच्या लिंबाळवाडी या गावात आता लोक जागरुक झाले आहेत. मात्र यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. गावातील तीन जणांचा बळी गेल्यानंतर लोकांमध्येमध्ये आता जागरुकता आली आहे.
लातूर : बाराशे लोकसंख्या असलेल्या गावात धार्मिक सप्ताह झाला आणि गावात कोरोनाची साथ पसरली. पाहता पाहता गावातील 188 लोकांना त्याची लागण झाली. कोरोनामुळे गावातील तीन जणांचा बळी गेला. ही दुर्दैवी कहाणी आहे लातूर जिल्ह्यातील लिंबाळवाडी गावाची. कोरोना संसर्ग अनुभवलेल्या या गावात आता लोक जागरुक झाले आहेत. मात्र यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागली.
लातूर जिल्ह्यातील लिंबाळवाडी गाव. गावाची लोकसंख्या बाराशेच्या आसपास. गावात अनेक मंदिर आहेत. इथलं वातावरण अतिशय धार्मिक आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गावात धार्मिक सप्ताह आयोजित करण्यात आला होता. गावातील अबालवृद्ध त्यास हजर होते. इथूनच गावात करोनाचा शिरकाव झाला. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गावातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. पाहत पाहता ही संख्या 100 च्या पार गेली होती. प्रशासन हादरुन गेले, गावात तपासणी करण्यात आली. पॉझिटिव्ह लोकांची संख्या 188 झाली. गावात सर्वत्र प्रतिबंधित क्षेत्र वाढली. प्रशासनाने गावबंदचे निर्देश दिले. गावातच राहून 150 पेक्षा जास्त लोक ठीक झाले. काही लोकांना चाकूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. आज गावात लोक यामधून सावरले आहेत. आता गावात कोरोना पसरु नये यासाठी सगळे निर्बंध कटाक्षपूर्वक पाळले जात आहेत. मात्र ही जागरुकता तीन लोकांचा बळी गेल्यावर आली आहे. मृतांमध्ये गणपती गाडे (वय 95 वर्षे), रुक्मिणीबाई साखरे (वय 90 वर्षे), शांताबाई बिराजदार (वय 55 वर्षे) यांचा समावेश आहे.
गावात असे काही होईल अशी काही शंका आली नाही. एक व्यक्ति पॉझिटिव्ह आला आणि जवळपास प्रति घरटी कोणीतरी पॉझिटिव्ह आढळत होता. प्रशासनाने तात्काळ पावले उचलली. सगळ्या गावकऱ्यांची चाचणी करण्यात आली. तीन जणांचा जीव गेला. गावकरी एकदिलाने या संकटातून बाहेर आले, असे मत लिंबाळावाडी चे सरपंच शरण बिराजदार यांनी व्यक्त केले.
या संसर्गानंतर गावात भयाण शांतता आहे. लहान थोर कोणीही मास्कशिवाय फिरत नाहीत. सध्या कोरोनाची माहिती देणाऱ्या फलकांनी गाव भरले आहे. वृद्ध व्यक्ती तोंडाला मास्क असल्याशिवाय बाहेर येत नाहीत.
'गावातील कोणीही कोणाच्या घरी जात नाहीत. कोणालाही घरात घेतले जात नाही. गावात धार्मिक कार्यक्रम आहे म्हणून मंदिरात गेले होते आणि असे झाले. मला काही ही त्रास झाला नाही. पण दोन नाती पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्या बऱ्या झाल्या आहेत, असे मत गावातील सगुणाबाई बिराजदार यांनी व्यक्त केले.
सतीश पाटील चार दिवसांपूर्वी लातूरच्या खासगी दवाखान्यात कोविडचा संसर्ग झाला म्हणून उपचार घेऊन आले आहेत. चार दिवस लातुरात होतो. पैसा खर्च झाला. अशी वेळ आई आणि बायकोवर आली नाही. आई धार्मिक कार्यक्रमाला गेली होती ते निमित्त झाले. अगोदर आई, मग बायको आणि नंतर मी पॉझिटिव आलो. त्या दोघी घरीच राहून ठीक झाल्या मला मात्र दवाखान्यात जावे लागले, दोन लहान मुलांना काही झाले नाही, असं ते सांगतात.
आज संपूर्ण गाव कोरोनामुक्त होत आहे. या गावात तीन लोकांचा बळी गेला. आता गावातील आबालवृद्ध सर्वच जण नियमाचे पालन करत आहेत. सगळी जण सुरक्षित अंतर ठेवून एकमेकांशी बोलत आहेत. कोणीही कोणाच्या घरी जात नाही. कोणालाही घरात घेतले जात नाही. ही जागरुकता येण्यासाठी या गावाला मोठी किंमत मोजावी लागली. असे मूल्य देऊन नियम आणि निर्बंध पाळायचे का? मूल्य देण्याआधीच निर्बंध का पाळले नाहीत? असा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे.