राजकीय आखाड्यात कुस्ती, आखाड्याबाहेर दोस्ती! ऐरवी राजकीय वैर, एकत्र आले की सैरभैर!
Sanjay Raut with Devendra Fadnavis : राजकीय मैदानात कुस्ती खेळणारे एकमेकांवर टीकेचे विखारी बाण सोडणारे नेते एकमेकांच्या गळ्यात गळे घालून चेष्टा मस्करी करताना एबीपी माझ्याच्या कॅमेरात कैद झाले.
नाशिक : संजय राऊत (Sanjay Raut) आणि देवेंद्र फडणवीस सध्याच्या राजकीय गणितांनुसार राजकारणातले एकमेकांचे वैरी... पण हेच राजकीय वैरी नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या लग्नात एकत्र आले. यावेळी संजय राऊत आणि प्रवीण दरेकर अगदी गळ्यात गळे घालून गप्पा मारत मारताना पाहायला मिळाले..तर इतर वेळी संजय राऊतांना आव्हान देणारे चंद्रकांत पाटील हे मात्र अगदी राऊतांच्या बाजूला बसले होते.
नाशिक : गेल्या काही दिवसात असा एकही दिवस गेला नाही की संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर किंवा केंद्रीय नेतृत्वावर टीका केली नसेल.. आजचा दिवसही त्याला अपवाद नव्हता. सकाळी साडे दहा वाजता राऊत यांनी मोदींसह चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. कृषी कायदे रद्द झाल्यानं दादांना वाईट वाटत असेल तर शोकसभा घेऊ चंद्रकांत दादांना शोक संदेश देतो असा टोला राऊत यांनी लगावला.
पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांवर टीकेची झोड उठविल्यानंतर आणखी एका कार्यक्रमात राऊत यांनी भाजपपासून दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र स्वतंत्र झाल्याचा हल्ला चढविला. मात्र दोन तासानंतर हे तेच संजय राऊत आहेत का? असा प्रश्न सर्वांनाच पडल्या वाचून राहणार नाही. ज्या चंद्रकांत पाटलांना शोक संदेश पाठविणार होते त्याच पाटलांशी गप्पा मारत बसले. देवेंद्र फडणवीस यांचा हात तर राऊत यांच्या हातातून सुटता सुटत नव्हता. हे कमी की काय म्हणून प्रविण दरेकर यांच्यातर गळ्यातचं पडले. भुजबळ यांनी नांदगांवचा नाद सोडावा असा टोकाचा इशारा दिला होता. मात्र त्याच भुजबळच्या मांडीला मांडी लावून गुजगोष्टी करत होते. भाजप आमदारच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहत आहेत याविषयी विचारले असता महाराष्ट्रची संस्कृती असल्याचे दाखले त्यांनी दिले.
संजय राऊत यांच्यांशी गप्पागोष्टी करून चंद्रकांत पाटील बाहेर आल्यानंतर राऊत यांच्यांवर पलटवार केला. संजय राऊत निम्मे डॉक्टर आहेत, त्यांनी माझी मानसिक स्थिती चेक करावी. मी त्यांचे डोके तपासतो अशी टीका केली. तर एकमेकांच्या सुख-दुःखात एकत्र येत असतो, असे सांगत वेळ मारून नेली.
राजकारणात कधीही काहीही होऊ शकते हे दोन वर्षांपूर्वी उभ्या महाराष्ट्राने बघितले. मात्र एकिकडे राजकिय कुस्ती खेळणारे नेते आपली दोस्ती निभावतात हे आजच्या प्रसंगावरून पुन्हा अधोरेखित झाले. त्यामुळे नेत्यांच्या वक्तव्यानंतर एकमेकांचे डोके फोडणारे कायदा हातात घेणाऱ्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी बोध घेणं गरजेचं आहे
Sanjay Raut with Devendra Fadnavis : एरवी टीकेची झोड, एकत्र आले की गप्पांते फड
संबंधित बातम्या :