Nanded Corona Update : नांदेड जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कठोर निर्बंध, बार, जीम, हॉटेल्स बंद
नांदेड जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे 31 मार्चपर्यंत कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. 31 मार्चपर्यंत जिल्हाभरात बार, जीम, हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 31 मार्चपर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टोरेंट, खाद्यगृह, परमिट रूम, बेकरी, स्वीटमार्ट, चाट भांडार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयामुळे वरील आस्थापनांवर उपजिवीका अवलंबून असलेल्यांना अर्थिक अडचण येऊ शकते हे लक्षात घेऊन तसेच नागरिकांच्या सोयीसाठी वरील आस्थापनांना पार्सल सेवा रात्री 10 वाजेपर्यंत ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व जीम, व्यायामशाळा, सार्वजनिक उद्याने 31 मार्चपर्यंत बंद राहतील, असे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी एकजुटीने मुकाबला करण्याची गरज आहे. त्यासाठी मास्क वापरणे, सतत हात धुणे आणि शारिरीक अंतर राखणे आवश्यक आहे. आपण याची काटेकोर अंमलबजावणी केली तर प्रशासनावर कठोर निर्णय घेण्याची वेळ येणार नाही. तसेच नागरिकांनी वरील त्रिसूञीचा अवलंब करून प्रशासनाला सहकार्य करावे आणि नांदेड जिल्हा कोरोनामुक्त करण्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी केलं आहे.
तसेच या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी केली, आणि कोविड-19 रूग्णांची संख्या कमी होऊ लागली तर परिस्थितीचा आढावा घेऊन या निर्णयांमध्ये 31 मार्च पूर्वी शिथीलता देण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने
राज्यात काल तब्बल 23 हजार 179 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातही चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नांदेड, ठाणे, अमरावती, अकोला जिल्ह्याचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंशतः लॉकडाऊन लावूनही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळ प्रशासन आणि नागरिकांसाठी आव्हान ठरणार आहे.
पुणे जिल्ह्यात परिस्थिती गंभीर
पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात तब्बल 4745 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर पंधरा रुग्णांचा मृत्यू झालाय. ही आतापर्यंत पुणे जिल्ह्यात एका दिवसात आढळून आलेली दुसऱ्या क्रमांकाची रुग्णांची संख्या आहे. 9455 व्यक्तींची चाचणी केल्यानंतर त्यामधून 4745 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. या आधी 10 सप्टेंबर 2020 ला पुण्यात 4935 रुग्णांची नोंद झाली होती. सध्या राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक गंभीर परिस्थिती आहे. कारण, रोजच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून तब्बल 32,359 अॅक्टीव कोरोना बाधित रुग्ण आहेत. राज्यात ही संख्या सर्वाधिक आहे.
नाशिकमध्ये रेकॉर्डब्रेक वाढ
नाशिक जिल्ह्यातही काल कोरोना रुग्णसंख्येत रेकॉर्डब्रेक वाढ पहायला मिळाली. यापूर्वी 16 सप्टेंबर 2020 ला 2 हजार 48 रुग्णांची नोंद झाली होती. तर आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल 2 हजार 146 नवे रुग्ण आणि 9 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात सर्वाधिक बाधित तर ग्रामीण भागातही वाढता प्रादुर्भाव पहायला मिळत आहे. नाशिक शहर - 1296, नाशिक ग्रामीण - 631, मालेगाव मनपा - 174 तर जिल्हा बाह्य - 45 रुग्णांची नोंद करण्यात आलीय. काल 697 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. अॅक्टिव रुग्णसंख्येनेही 10 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या 10 हजार 851 बाधितांवर उपचार सुरु आहेत.