Maharashtra Mumbai Rains : राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस, रायगडसह पालघर आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट
सद्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
Maharashtra Rain : सद्या राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. एनेक ठिकाणी शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
दरम्यान, मागील काही दिवस राज्यातील अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. आज रायगड पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काल नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. तर महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बुलढाण्यातील कोराडी मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने मेहकर तालुक्यातील कोराडी मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला. कोराडी प्रकल्प तुडूंब भरल्यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. कोराडी प्रकल्प तुडुंब भरल्यामुळे कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सुरक्षिततेच्या दृष्ठीने धोक्याचा इशारा दिला आहे.गेल्या वर्षी याच प्रकल्पाच्या सांडव्यावर पिकनिक साठी आलेले चार तरुण अचानक पाणी वाढल्याने अडकले होते ज्यात एका तरुणाचा मृत्यू झाला होता त्यामुळे प्रशासनाने आता खबरदारी घेतली आहे.
भिवंडीत मुसळधार पाऊस, शहरातील दुकानं पाण्याखाली
भिवंडी शहरात काल दुपारपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसानं शहराला झोडपून काढलं आहे. त्यामध्ये शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरलं आहे. शहरातील तीन बत्ती, भाजी मार्केट ,बाजारपेठ,मंडई , ईदगाह व बंदर मोहल्ला परिसरात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. या भागातील शेकडो दुकान पाण्याखाली गेली असून या भागात तब्बल तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले आहे. तसेच आपत्कालीन विभागाच्या वतीने या परिसरामध्ये रेस्क्यू केले जात आहे. या भागात जाण्यास रोखण्यात येत आहे. परंतू पावसाचा जोर जर कायम राहिला तर या ठिकाणची परिस्थिती अजूनही बिकट होऊ शकते.