Maharashtra Monsoon Updates : राज्यात पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व सरी; तर विदर्भात उष्णतेची लाट कायम!
Maharashtra Monsoon Updates : राज्यात पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व सरी कोसळणार, हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Monsoon Updates : सध्या राज्यात उष्णतेच्या लाटेनं हैराण केलं आहे. उकाड्यानं हैराण झालेला प्रत्येकजण चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. अशातच हवामान खात्यानं मान्सूनबाबत काहीसा दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. येत्या 5 दिवसांत राज्यात अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात यंदा मान्सून (Monsoon) लवकर येण्याचा अंदाज हवामान खात्यानं खरंतर वर्तवला होता. मात्र पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसल्यानं गेले चार दिवस मान्सून कर्नाटकातल्या कारवारपर्यंत येऊन थांबला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाल्यामुळे मान्सून कर्नाटकातच थबकल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली. पण असं असलं तरी पुढील 5 दिवसांत राज्यातल्या अनेक भागात जोरदार मान्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासह इतरही अनेक भागांत उष्णतेची लाट (Heat Wave) कायम राहणार आहे.
केरळ आणि लगतच्या राज्यांत मान्सूनचं आगमन
अरबी समुद्राच्या बाजूने मान्सूननं 29 मे रोजीचं केरळात प्रवेश केला होता. त्यानंतर 31 मे रोजी मान्सून कर्नाटकच्या कारवापर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर गोव्यापासून काही अंतरावर असताना पोषक वातावरणामुळं तो केवळ दोन दिवसांत केरळमध्ये (Kerala) पोहोचेल, असं भाकीत हवामान विभागानं केलं होतं. पण अचानक हवामानात झालेल्या बदलामुळं नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मान्सून कर्नाटकच्या कारवारमध्येच रेंगाळला आहे. पण दुसरीकडे बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्यानं लगतच्या बहुतांश भागांत मान्सूननं प्रवेश केला आहे.
पश्चिम बंगालच्या काही शहरांसह, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागांत मान्सूननं धडक दिली आहे. याशिवाय, मेघालयमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्ययुक्त वाऱ्यांमुळे कर्नाटक, केरळ, लक्षद्विप, तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या काही भागातही पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात उष्णतेची लाट
एकीकडे मान्सूनचा प्रवास मंदावला असला तरी तिकडे उत्तर आणि मध्य भारतात मात्र उष्णतेची लाट आली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या, उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भासह उत्तर भारतात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट असून ती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
उत्तर भारतातल्या अनेक शहरांमध्ये पारा 44 अंश सेल्सियसच्या पार गेला आहे. जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, विदर्भ, उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग या ठिकाणी याचा सर्वाधिक फटका बसला आहे. काल (शनिवारी) देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात झाली आहे. चंद्रपुरात 46 अंशांहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे.