Maharashtra Monsoon Rain LIVE : नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, हजारो हेक्टरवरील पिकांना मोठा फटका
Maharashtra Monsoon Rain LIVE : राज्याच्या काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्याप काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
LIVE
Background
Maharashtra Monsoon Rain LIVE : मागील दोन तीन दिवसात राज्यातील काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. मात्र, आज अनेक ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. अद्यापही काही ठिकाणी चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला, त्या ठिकाणचे शेतकरी पेरणी करत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, रात्री मुंबई शहरासह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तसेच अहमदनगर, गडचिरोलीसह वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस झाला.
दरम्यान, राज्याच्या काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळं पेरणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, राज्यातील इतर भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पेरणीसाठी शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी 40 ते 50 कि.मी. ते 60 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे. मच्छिमारांनी सदर कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
एकीकडं हवामान खात्याकडून भाकितांचा पाऊस पडतोय, तर दुसरीकडं राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाअभावी पेरणी रखडली आहे. मान्सूननं महाराष्ट्र व्यापल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्षात राज्यभरात पावसाची प्रतीक्षा आहे. पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांना पेरणीची तिफण गोठ्यातच ठेवावी लागली आहे. राज्यात खरीप हंगामातील तृण धान्याखालील क्षेत्र 36 लाख 37 हजार हेक्टरपर्यंत आहे. तर तेलबियांचे (भुईमूग, तीळ, कारळ, सुर्यफूल, सोयाबीन) क्षेत्र 41 लाख 58 हजार हेक्टर तर कापसाचं क्षेत्र जवळपास 42 लाख हेक्टरपर्यंत आहे.
मुसळधार पावसामुळं नांदेडमध्ये कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर या पिकांचं मोठं नुकसान
मुसळधार पावसामुळं नांदेड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर या पिकांचं नुकसान झालं आहे.
नांदेड दिल्ह्यातील जांभळा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतीचं मोठं नुकसान
नांदेड जिल्ह्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसधार पाऊस झाला आहे. हदगाव तालुक्यातील जांभळा परिसरातील चार गावात काल सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळं पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी गावात शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे. या ढगफुटीमुळं पेरलेली पिकं खरडून जाऊन प्रचंड नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
दक्षिण मुंबईसह परिसरात पावसाची हजेरी
दक्षिण मुंबईसह परिसरात पावसाची हजेरी. सकाळपासूनच त्याठिकाणी पावसाची चांगली रिपरिप सुरु आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला आहे. मात्र सध्या जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पाऊस सुरु आहे.