''ऊर्जामंत्र्यांना केवळ 'नाश्ता' न दिल्यानेच अतिरिक्त लोडशेडिंग!" कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा ऊर्जामंत्र्यांनाच घरचा आहेर
Lonar News : उर्जामंत्र्यांना केवळ 'नाश्ता' न दिल्यानेच लोणार मध्ये अतिरिक्त लोडशेडिंग करण्यात येत असल्याचे कॉग्रेसच्या ज्येष्ठ नेते म्हणाले, यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Lonar News : महाराष्ट्रासह देशात कोळसाटंचाईचे संकट गडद होऊन वीजनिर्मिवर परिणाम होत असतानाच, राज्य व केंद्र सरकारकडून वेगवेगळी स्थिती मांडली जात आहे. तसेच यावरून आता राजकीय टीका देखील होताना दिसत आहे. अशातच कॉग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर अजब टीका केलीय, ते म्हणाले, उर्जामंत्र्यांना केवळ 'नाश्ता' न दिल्यानेच लोणार मध्ये अतिरिक्त लोडशेडिंग करण्यात येत असल्याचे ते म्हणाले, यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
"नाश्ता न दिल्याने लोणार शहरात अतिरिक्त लोडशेडिंग...!"
लोणार कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व नगरसेवक आबेद खान यांना राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या अजब टीका करत त्यांना घरचा आहेर दिला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे लोणार येथे 1 मार्च रोजी विविध विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्याला आले होते, त्या वेळी त्यांनी ग्राहक मेळावा आयोजित केला होता, परंतु त्या ग्राहक मेळाव्याचा प्रचार आणि प्रसार न केल्याने मेळाव्याला बोटावर मोजण्या इतकेच ग्राहक उपस्थित होते, त्यानंतर ते त्या ठिकाणावरून लोणार येथील वनकुटी येथे अल्पोहर करण्यासाठी गेले, मात्र महावितरण विभागाने त्यांची तिथे कोणतीच व्यवस्था न केल्याने, नितीन राऊत यांनी तेव्हा पासून लोणार विषयी राग मनात ठेउन आता कारण नसतांना अतिरिक्त लोडशेडिंग सुरू केले असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व लोणार नगररिषदचे नगरसेवक आबेद खान पठाण यांनी केला आहे.
"ऊर्जामंत्र्यांनी कोणताही दुजाभाव न करता लोडशेडिंग बंद करावी"
सध्या सर्व समाज बांधवांचे सण उत्सव सुरू आहे, त्या मध्ये मुस्लिम समाजाचे पवित्र असे रमजानचे उपवास सुरू आहे, यामध्ये लहान मुले वयोवृद्ध तसेच समाज बांधव उपवास करतात, परंतु दुपारी अतिशय उष्ण तापमान असतांनाही लोडशेडिंग असल्याने जीव पाणी पाणी करतो, परंतु अनेक वेळा समाज बांधवांनी विनंती करूनही लोडशेडिंग बंद केली नाही, उलट अतिरिक्त लोडशेडिंग सुरू करण्यात आली आहे, या मध्ये रात्री अपरात्री वीज जात आहे, त्यामुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कोणतेही दुजा भाव न करता लोडशेडिंग बंद करावी असा घरचा आहेर नगरसेवक आबेद खान पठाण यांनी केली आहे .
आरोप-प्रत्यारोपांचा पारा चढताना दिसतोय
राज्यात कडाक्याचं ऊन वाढत आहे. तसाच आरोप- प्रत्यारोपांचा पारा ही चढताना पाहायला मिळतोय. उष्णता प्रचंड वाढत चालल्याने राज्यात विजेची मागणी सुद्धा वाढू लागली आहे. वीज निर्मिती करण्यासाठी कोळशाचा तुटवडा जाणवू लागला आहे. केंद्र सरकारकडून कोळशाचा पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. कधी कोळसा मिळतो तर कधी तो आणण्यासाठी रेल्वे रॅक मिळत नाही, असा आरोप सातत्याने पाहायाला मिळतोय. यावर राजकारण असल्याची टीका महाविकास आघाडीकडून होताना पाहायला मिळत आहे. यातच भर म्हणून विज निर्मिती करणाऱ्या टाटा पॉवर, अदाणी ग्रुप आणि जेएसडब्ल्यू या कंपन्यांनी वीज पुरवठा कमी केला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या पुढे आणखी अडचण वाढताना पाहायाला मिळत आहे. याच्या मागे राजकारण असल्याची टीका होताना पाहायाला मिळतेय. मात्र ऊर्जा विभाग सांभाळण्यात अपयश येत असून राज्य सरकारच्या गलथानपणामुळे राज्यात भारनियमन करावा लागत असल्याची टीका भाजपच्या नेत्यांनी केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारला बदनाम करण्यात काही अर्थ नसल्याचं भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.