Maharashtra Live Updates 31 July 2022 : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 31 Jul 2022 11:57 PM
Aurangabad: मराठा आरक्षण मिळवून देणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

'जसं ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून दिलं, तसं मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ', असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

असलम शेख यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, मोहित कंबोज देखील उपस्थित

काँग्रेसचे नेते माजी मंत्री असलम शेख यांनी सागर या देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत मोहित कंबोज देखील उपस्थित होते. 

Nagpur news Update : नागपुरात दिवसा-ढवळ्या भररस्त्यात तरूणाचा निर्घृण खून 

नागपूर शहरात पुन्हा एकदा दिवसा-ढवळ्या हत्येची घटना घडली आहे. धारधार शस्त्राने वार करून तरूणाची हत्या करण्यात आली आहे. गिट्टीखदान पोलीस स्टेशन आणि गुन्हेशाखा कार्यालयाच्या जवळ ही हत्या झाली आहे. नारायण गयाप्रसाद द्विवेदी असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. 

Nagpur Covid Update : सक्रिय कोरोना बाधितसंख्या 2 हजार 292 वर, एका बाधिताचा मृत्यू

नागपूरः जिल्ह्यातील सक्रिय कोरोनाबाधित संख्या 2 हजार 292 वर पोहोचली आहे. रविवारी प्राप्त अहवालानुसार 174 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. तर एका बाधिताचा मृत्यू झाला. तसेच 212 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. आज जिल्ह्यात 2368 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. तर 286 रॅपिड अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या 57 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु असून 2235 बाधित गृहविलगीकरणात आहेत.

सत्तारांच्या मतदारसंघात शिंदेचं शक्तिप्रदर्शन, आता आम्हाला चांगला कॅप्टन मिळालाय: अर्जुन खोतकर

शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तर यांच्या मतदारसंघात शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. यावेळी बोलताना शिवसेनेचे बंडखोर नेते अर्जुन खोतकर म्हणाले आहेत की, आता आम्हाला चांगला कॅप्टन मिळालाय.  कॅप्टन चांगला असतो त्याची नाव किनारी जाते. आमचे कॅप्टन शिंदे आहेत.

दुचाकी चोरी करणारे टोळी जेरबंद; चौघांना अटक, आठ वाहने जप्त

शहरातील दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. यामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली असून आठ दुचाकी वाहने असा एकूण किंमत एक लाख 25 हजाराचा मुदे्माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई यवतमाळ शहर पोलिसांनी केली. आकाश श्रीकृष्ण कुमरे, जितेंद्र शंकर जाधव, नागसेन ऊर्फ बालु केशव मनवर,  संदिप ऊर्फ मोधन भिमराव कांबळे  असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.

हार्बर मार्गाची पनवेलकडे जाणारी वाहतूक खोळंबली

चुनाभट्टी स्टेशनवर काहीतरी तांत्रिक बिघाड, पनवेलकडे जाणारी वाहतूक खोळंबली. गाड्या वडाळा रोड स्टेशनवर थांबून

राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद, मुंबईत घाटकोपर येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांच्या विरोधात निदर्शनं

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज मुंबईत उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसने घाटकोपर येथे राज्यपालांच्या विरोधात निदर्शने केली. मात्र मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने आंदोलकांना रस्ता रोको करता आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कोश्यारी यांच्या विरोधात निदर्शनं केली. मात्र राज्यपालांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करीत असतानाच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून खुनातील संशयिताने ठोकली धूम

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी भन्नाट आणि नवनवीन फिचर आणण्याच्या तयारीत असतो. कधी कधी प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवणं युजर्ससाठी कठीण होऊन जातं. अनेक वेळा व्हॉट्सअ‍ॅपबाबतच्या नव्या अपडेट चाहत्यांपर्यंत उशिराने पोहोचतात. यावर उपाय म्हणून व्हॉट्सअ‍ॅप आता नवीन चॅटबॉट (Chatbot) अर्थात सॉफ्टवेअर अपडेट आणण्याच्या तयारीत आहे. 


येथे सविस्तर बातमी वाचा.

Shivsena : शिवसेनेचे ठाण्यातील खासदार राजन विचारे मातोश्रीवर दाखल, ठाण्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित

Shivena : शिवसेनेचे ठाण्यातील खासदार राजन विचारे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघेदेखील आहेत. त्यांच्यासह ठाण्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित आहे. 

NIA कडून कोल्हापूर, नांदेडमध्ये छापेमारी; ISIS संबंधित प्रकरणात मोठी कारवाई

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) 6 राज्यांमध्ये 13 संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि रायसेन जिल्हे, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद जिल्हे, बिहारमधील अररिया जिल्हा, कर्नाटकातील भटकळ आणि तुमकूर शहर जिल्हे, महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्हे आणि उत्तर प्रदेशातील देवबंद जिल्ह्यांमध्ये ISIS च्या कारवायांशी संबंधित छापेमारी करण्यात आली.


येथे सविस्तर बातमी वाचा.

Jalgaon News : गेल्या आठशे वर्षांपासून कनाशी गावाची परंपरा, संपूर्ण शाकाहारी गाव

Jalgaon News : बदलत्या काळात  मांसाहार आणि  व्यसनाधीनतेचे आहारी गेल्याचे पाहायला मिळत असताना या सर्व पासून दूर राहून संपूर्ण शाकाहारी गाव अशी ओळख जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील कनाशी  निर्माण केली आहे, गेल्या आठशे वर्षांपासून या गावानं शाकाहारची अखंड परंपरा जपली आहे

Ulhasnagar News : उल्हासनगरात मिळतेय अवघ्या 25 रुपयात साडी, सामाजिक भावनेतून विक्रेत्याने लावला सेल

Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये सध्या साड्यांचा एक आगळावेगळा सेल लागलाय. या सेलमध्ये अवघ्या २५ रुपयात साडी मिळतेय. या साड्या खरेदी करण्यासाठी महिला गर्दी करतायत. उल्हासनगरच्या गजानन मार्केट परिसरात असलेल्या रंग क्रिएशन या साड्यांच्या दुकानात हा सेल लागलाय. यामध्ये अवघ्या 25 रुपयात साडी मिळणार आहे. मात्र यासाठी आधारकार्ड कंपल्सरी असून एका महिलेला एकच साडी दिली जातेय. या साड्या घेण्यासाठी महिला गर्दी करतायत. या दुकानात 25 रुपयांच्या साड्यांव्यतिरिक्त अन्यही साड्या विक्रीसाठी आहेत. मात्र गोरगरिबांचा फायदा झाला पाहिजे या सामाजिक भावनेतून हा सेल सुरू करण्यात आल्याचं दुकानमालकांचं म्हणणं आहे.

Sangli News : सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून खुनातील आरोपीचे पलायन. कारागृहाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Sangli News : सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून खुनातील आरोपीने पलायन केले. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वैरण अड्डा येथील भिंतीवरून उडी मारून पसार झाला सुनील राठोड असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. राठोड पती-पत्नीला तासगाव खून प्रकरणी अटक केली होती. यामुळे कारागृहाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

पश्चिम बंगाल ते महाराष्ट्रापर्यंत फक्त ईडीची चर्चा, जाणून घ्या काय आहे ईडीचा इतिहास, शक्ती आणि अधिकार!

पश्चिम बंगालपासून ते महाराष्ट्रापर्यंत देशात अनेक ठिकाणी ईडीची कारवाई सुरू आहे. ताजे प्रकरण शिवसेना नेते संजय राऊत यांचे आहे, ज्यांच्यावर पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई सुरू आहे. त्याचवेळी, बंगालचे बडतर्फ मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अटक करून त्यांची चौकशी केली जात आहे. अशा परिस्थितीत अंमलबजावणी संचालनालय म्हणजे काय? त्याचा इतिहास काय आहे, ते कसे कार्य करते आणि त्याचे अधिकार काय आहेत हे जाणून घ्या.


येथे सविस्तर बातमी वाचा.

आदित्य ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर
आदित्य ठाकरे यांचा सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. उद्या दुपारी 4 वाजता कोकणातून आंबोली मार्गे आदित्य ठाकरे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा याठिकाणी येतील. त्याठिकाणी आदित्य ठाकरे यांची सभा होईल. त्यानंतर आजऱ्यातून आदित्य ठाकरे कोल्हापूरच्या दिशेनं रवाना होतील. कोल्हापूरमध्ये 6.30 वाजता पोहचतील. अंबाबाई दर्शन घेऊन झाल्यानंतर आणि शहर कार्यालय उद्घाटन झाल्यानंतर मिरजकर तिकटी याठिकाणी त्यांची सभा होईल. उद्या आदित्य ठाकरे यांचा मुक्काम कोल्हापुरात असेल दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 ऑगस्टला शिरोळ याठिकाणी आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे.
उस्मानाबाद : नीलम गोऱ्हे यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज तुळजाभवानीचे दर्शन घेतले त्यांनी तुळजाभवानी देवीला चांदीच्या पादुका अर्पण केल्या. या पादुका देवीला अर्पण करण्या पूर्वी या पादुकांची पूजा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या आणि पत्नी रश्मी ठाकरे हस्ते या पादुकांची पूजा करण्यात आली होती. त्याच पादुका आज नीलम गोऱ्हे यांनी देवींच्या चरणी अर्पण करत आशीर्वाद घेतले.

औरंगाबाद : माजी मंत्री सुरेश नवले शिंदे गटात प्रवेश करणार

औरंगाबाद येथील सिल्लोडच्या कार्यक्रमात आज माजी मंत्री सुरेश नवले शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशाची तयारी पूर्ण झाली असून बीडमधून नवले समर्थक कार्यक्रमाकडे रवाना होत आहेत. शिवसेनेत असताना त्यांनी मंत्री पद भूषवले होते, तर एकेकाळी ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ असलेले सुरेश नवले आज मात्र शिंदे गटात सामील होतायत. त्यामुळे बीडमधून हा उद्धव ठाकरे यांना आणि काँग्रेसला धक्का मानला जातोय. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राजकारणात बरेच वर्ष अलिप्त राहून त्यांनी नवले मित्र स्थापन केलं. त्या माध्यमातून काम आज मात्र ते प्रवेश करत आहे. सिल्लोड नगर परिषदेस भरीव निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन अब्दुल सत्तार यांनी केले आणि याच कार्यक्रमात अर्जुन खोतकर यांच्यासह सुरेश नवले यांचा देखील प्रवेश शिंदे गटात होणार आहे.

रत्नागिरी : उद्यापासून मासेमारी सुरू, 1 जून ते 31 जुलै या काळात बंद होती मासेमारी

01 जून ते 31 जुलै या काळात बंद असलेली मासेमारी उद्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे आता मत्स्यप्रेमी आणि खवयाच्या ताटात ताजे मासे मिळणार आहेत. पावसाळ्यात समुद्राला असलेलं उधाण, माशांच्या प्रजननाचा काळ या कारणास्तव जून आणि जुलै या कालावधीमध्ये मासेमारी बंद असते.  सध्या कोकणात पाऊस देखील नाही. शिवाय समुद्राला असलेल्या उधाण सध्याच्या घडीला कमी आहे. त्यामुळे काही मासेमार समुद्रात मासेमारीसाठी जाऊ शकतात अशी माहिती काही मच्छीमारांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे. राज्यात 15 लाखाहून अधिक कुटुंबं मासेमारीवर अवलंबून आहेत. याशिवाय परराज्यातून देखील मोठ्या प्रमाणात खलाशी या ठिकाणी दाखल होत असतात. पर्सेसिन बोटी वगळता ट्रॉलिंग आणि गिलनेटसह मच्छीमार बोटिंची संख्या तीन हजाराच्या घरात आहे. केवळ आपल्याच महाराष्ट्रातून वर्षाकाठी चार ते पाच लाख हजार मॅट्रिक टन इतकी मासेमारी होत असते.

मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि सकाळी राऊतांवर कारवाई; चर्चांना उधाण

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री अचानकपणे केलेला दिल्ली दौरा आणि आज सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर झालेली ईडीची कारवाई यातील संबंधाबाबत आता नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यात पुरामुळे नुकसान झालेल्या भागाच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला गेले होते. त्यानंतर दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली असल्याची माहिती होती. या दौऱ्यानंतर आज सकाळी राऊतांच्या घरी ईडीने कारवाई करणे, या योगायोगाबाबत चर्चा सुरू झाल्यात. 


येथे सविस्तर बातमी वाचा.

Nitesh Rane : ...तर तीन-तीन वेळा ईडीच्या चौकशी का चुकवता? नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल

Nitesh Rane : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीची अद्यापही चौकशी सुरू आहे, कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. या अगोदर सुद्धा ईडीच्या तीन वेळा नोटीसा संजय राऊत यांना गेल्या होत्या. मात्र हे महाशय वेगवेगळी कारण देऊन पळायचे. पळकूट ज्यांना आपण म्हणतो त्यातील हा एक व्यक्ती आहे. तुम्ही जर कोणत्याही घोटाळ्यात सहभागी नसाल तर तीन-तीन वेळा ईडीच्या चौकशी का चुकवता असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला. 

Nashik News : जायकवाडी धरणात पाण्याची आवक, गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग, युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Nashik News : जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्याने सद्या गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान याच गोदावरी नदीत उडी मारून एका 35 वर्षीय युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांकडून त्याचा शोधकार्य सुरु असून, पाण्याचा वेग जास्त असल्याने  शोधकार्यात अडचणी येत आहेत. प्रवीण भगवान पवार ( रा. पाटेगाव, ता. पैठण) असे या तरुणाचे नाव आहे.

वर्ध्यातील एका घरात मोठा स्फोट; कारण मात्र अस्पष्ट

वर्धा शहरातील वंजारी चौकात असलेल्या वंजारी यांच्या घरी कोणी नसताना मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे घराची भिंत कोसळली. इतकंच नाही तर घरातील वस्तूंचं मोठं नुकसान झालं. जवळच्या दुकानाच्या काचाही फुटल्या. या स्फोटात घरातील वस्तूंचं मोठं नुकसान झालं. घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त झाल्या, सुदैवाने घरी कुणी नसल्याने जीवितहानी टळली. घराची पाहणी करण्यात आली. मात्र सिलिंडर शाबूत, आणि फ्रिजही व्यवस्थित होता. तर मग हा स्फोट नेमका कशाचा हे कळू शकलेलं नाही.


येथे सविस्तर बातमी वाचा.

संजय राऊतांवर कारवाई अपेक्षित होतीच : छगन भुजबळ

संजय राऊत यांच्यावर ही कारवाई अपेक्षित होतीच, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. 'एकदा ईडीचा तपास सुरु झाला की त्यांचे ऑफिस, घर चेक करतात. इथे भुजबळ फार्मवर पण किती वेळा धाडी पडतात, मोजता येत नव्हत्या एवढ्या धाडी पडल्या तपासाचा तो भाग आहे. अटक होईल का त्याबाबत बोलू शकणार नाही', असंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय.

देशात 19 हजार 673 नवीन कोरोनाबाधित, 39 रुग्णांचा मृत्यू

देशात 19 हजार 673 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्याची कोरोनाची स्थिती जाणून घ्या.





एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंसोबतच्या त्यांच्याच फोटोची फ्रेम गिफ्ट दिल्यानंतर...

शिवसेना-शिंदे गटात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्याने दिलेला हा फोटो सद्या चर्चेचा विषय बनला आहे. औरंगाबादमध्य्ये मुख्यमंत्री शिंदे यांना एका कार्यकर्त्याने उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंची एकत्र असलेली फोटोची फ्रेम गिफ्ट दिली.


पाहा फोटो


 

घटनात्मक कोंडीच्या प्रसंगी सर्वोच्च न्यायालय ऐतिहासिक निर्णय देईल : नीलम गोऱ्हे

शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य या निर्णयावर अवलंबून असताना विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी एक चांगला ऐतिहासिक निर्णय येईल असे भाकीत व्यक्त केलं आहे.





भारतात ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरु होणार

भारतात लवकरच 5G सेवा (5G Service) सुरु होणार आहे. भारतात सध्या 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया सुरु आहे. शनिवारी या प्रक्रियेचा पाचवा दिवस होता. केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे की, 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया संपवत ऑक्टोबरमध्ये भारतात 5G सेवा सुरु करण्याचा प्रयत्न असेल. भारतातील 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. यामुळे भारतात लवकरच ऐतिहासिक घटना घडणार आहे. 


येथे सविस्तर बातमी वाचा.

आज अनेक मार्गांवर मेगाब्लॉक, जाणून घ्या

लोकल रेल्वेला (Local Railway) मुंबईची लाईफ लाईन म्हणतात. लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज रविवारी (31 जुलै) रेल्वेने अनेक मार्गांवर मेगाब्लॉक ठेवला आहे. हा मेगाब्लॉक हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेमध्ये ठेवण्यात आला आहे. तर सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक असणार नाही.


येथे सविस्तर बातमी वाचा.

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून सोडलेल्या पाण्यात तरुणाने मारली उडी; पोलिसांकडून शोधकार्य सुरु

जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्याने सद्या गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान याच गोदावरी नदीत उडी मारून एका 35 वर्षीय युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांकडून त्याचा शोधकार्य सुरु असून, पाण्याचा वेग जास्त असल्याने  शोधकार्यात अडचणी येत आहेत. प्रवीण भगवान पवार ( रा. पाटेगाव, ता. पैठण)  असे या तरुणाचं नाव आहे. 


येथे सविस्तर बातमी वाचा.

आजच करुन घ्या 'ही' चार महत्त्वाची कामं

आज 31 जुलै आहे, या महिन्याचा शेवटचा दिवस. आज अनेक आर्थिक कामांसाठीची मुदत संपत आहे. त्यामुळे जर तुमची ही कामं राहिली असतील तर ही कामं लगेच पूर्ण करुन घ्या, अन्यथा तुमच्या समोर अनेक अडचणी येतील. याशिवाय तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे ही कामं आजच आटपून घ्या नाहीतर तुम्हाला नुकसान भोगावं लागेल. यामधील महत्त्वाचं एक काम म्हणजे आयकर परतावा. आज 31 जुलै रोजी आयकर परतावा दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 


सविस्तर बातमी वाचा

खासदार संजय राऊतांच्या घरी EDची टीम पोहोचली, पत्राचाळ प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा शेवटचा दिवस - 
अद्याप इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नसेल तर लवकर भरून घ्या. कारण इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची  शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे.  त्यामुळे करदात्यांना आयटीआर भरण्यासाठी काही तासच शिल्लक राहिले आहेत. आयकर विभागाकडून 31 जुलै पर्यंत आयटी रिटर्न भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्यापर्यंत ITR भरला नाही तर पाच हजार रूपये दंड भरावा लागणार आहे. 


 युवा सेनेची स्वाक्षरी मोहीम -
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी आज युवासेनेकडून राज्यपालांविरोधात राज्यातल्या प्रत्येक विधानसभेत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.  


 राज्यपालांनी माफी मागावी - उद्धव ठाकरे
 मुंबईसंदर्भात केलेल्या वक्तव्याची राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यपालांना घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी कोल्हापूर जोड्यावरुन उद्धव ठाकरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याप्रकरणी राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता. 
 
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीही नाराज -
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वकत्व्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच फडणवीस म्हणाले की, राज्यपालांच्या वक्तव्याशी भाजपचा संबंध नाही. 


 नाना पटोले काय म्हणाले?
काँग्रेसचे दिग्गज नेता नाना पटोले म्हणाले की, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं वक्तव्य अपमानजनक आहे. केंद्र सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा. त्यांना गुजरात अथवा राज्यस्थानला पाठवायला पाहिजे. कोश्यारींच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आज आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता. 
 
 एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर - 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले आहे. भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या ते भेटीगाठी घेणार आहेत. त्यांचा हा दौरा मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आहे, अशी चर्चा आहे. 


 पंतप्रधान ‘मन की बात’ कार्यक्रमातून साधणार संवाद -
पंतप्रधानांचा जनतेशी होणारा मासिक संवादात्मक कार्यक्रम, ‘मन की बात’ उद्या म्हणजेच 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांनी आवर्जून ऐकावा, असे  आवाहन पंतप्रधानांनी केले  आहे.  मन की बात कार्यक्रमाचा हा 91 वा भाग आहे. 


 अमित शाह भाजपच्या संयुक्त राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत हजेरी लावणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पाटाना येथे होणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमध्ये उपस्थिती दर्शवणार आहे.  या कार्यक्रमात अमित शाह संबोधित करणार आहेत. 


 संयुक्त किसान मोर्चाचं केंद्र सरकार विरोधात आंदोलन -
संयुक्त किसान मोर्चाने  आज केंद्र सरकारविरोधात चक्काजामची घोषणा केली आहे. एमएसपी कमिटीच्या धोरणाविरोधात आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यासोबत आंदोलनावेळी दाखल झालेले गुन्हा माघार न घेतल्यामुळे आंदोलन पुकारण्यात आले आहे. पंजाब, हरियाणा आणि पश्चिमी उत्तर प्रदेश या भागात आंदोलन दिसून येईल. 


 भारत-पाकिस्तान सामना -
 राष्ट्रकुल स्पर्धेत रविवारी भारतीय महिला आणि पाकिस्तान महिला संघामध्ये लढत होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता सामना रंगणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिलांना ऑस्ट्रेलियाकडून तीन विकेटनं पराभव स्वीकारावा लागला होता. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.