मुंबई : वाहन म्हटलं की आपलं लक्ष जात ते रंगाकडे, डिझाईनकडे किंवा इंजिनकडे . मात्र गाडीला पुढे नेणाऱ्या भागाची फारशी चर्चा होत नाही. होय, आपण टायरबद्दलच बोलतोय. आपल्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनाचे टायर सुस्थितीत असणं अतिशय गरजेचं आहे, नाहीतर भीषण अपघात होण्याची देखील शक्यता असते.
चला तर मग, पाहूयात टायरची काळजी कशी घ्यायची.
1. हवेचा दाब
चारही टायरमध्ये हवेचा दाब अपेक्षित आहे तेवढा आहे का, ते नियमितपणे तपासा. शहरात ड्राईव्ह करत असाल तर दर चार-पाच दिवसांनी, आणि लांबच्या प्रवासात दर 250-300 किलोमीटरनंटर दाब तपासलाच पाहिजे.
2. हवा जास्त असेल तर...
महामार्गांवर अनेकदा गाडीचा वेग ताशी 80-100 किमी एवढा असतो. या वेगात टायरमध्ये हवा वाढत जाते. दाब तपासून अतिरिक्त हवा काढली नाही तर टायर फुटण्याचा धोका असतो. लक्षात ठेवा, टायर फुटल्यावर अतिशय भीषण अपघात होतात, ज्यामध्ये जीव जाण्याची दाट शक्यता असते.
3. हवा कमी असेल तर...
शहरातील खड्डेखुड्डे असलेल्या रस्त्यांवर गाडी चालली की हवा कमी होत जाते. उदाहरणार्थ, अपेक्षित दाब 33 असेल तर 3-4 दिवसांत हा आकडा 28-29वर जातो. यानं दोन मोठे तोटे होतात. एक तर टायर खराब होतं, आणि दुसरं म्हणजे इंधन जास्त लागत असल्यानं खर्च वाढतो.
4. गाडी व्यवस्थित चालवा
आपली दुचाकी किंवा चारचाकी म्हणजे रणगाडा नव्हे. त्यामुळे खड्डे, स्पीडब्रेकर असताना वेग कमी करा. वाहतूक कोंडीत गाडी रस्त्याच्या खाली उतरवू नका. तसंच, वेग वाढवणं किंवा कमी करणं अचानक करू नका, तसं केलंत तर टायर लवकर झिजतं.
5. 'अलाईनमेंट' आणि 'बॅलन्सिंग'
टायरबद्दल सर्वात दुर्लक्षित म्हणजे वरील दोन बाबी. चाकं संतुलित नसतील तर चाकाची आतली किंवा बाहेरची बाजू रस्त्यावर अधिक घासली जाते, ज्यामुळे झीज वाढते. त्यामुळे नियमितपणे 'अलाईनमेंट' आणि 'बॅलन्सिंग' केलंच पाहिजे.
6. अदलाबदल
जर 6 ते 8 हजार किमीनंतर पुढचे टायर मागे, आणि मागचे पुढे बसवा. कारण वळण्यासाठी पुढची चाकं कामास येतात, त्यामुळे ते जास्त झिजतात. ही झीज समसमान असावी, यासाठी टायर्सची अदलाबदल गरजेची असते.
7. अति वजन नको
प्रत्येक वाहनाची विशिष्ठ वजन क्षमता असते, त्यानुसार टायर किती मोठं लावायचं हे कंपनीनं ठरवलेलं असतं. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी किंवा सामान नेणं टाळा.
8. हवेऐवजी नायट्रोजन भरा
नायट्रोजन वायू हा मुळात थंड असतो, त्यामुळे खासकरून उन्हाळ्यात टायर थंड राहतं. नायट्रोजनमुळे गाडीची स्थिरता देखील वाढते.
9. टायर वेळेत बदला
50 हजार किलोमीटरनंतर टायर बदललंच पाहिजे. टायर जेवढं जास्त गुळगुळीत, तेवढा अपघाताचा धोका जास्त. म्हणूनच, खर्च टाळण्यासाठी टायर बदलणं पुढे ढकलू नका.
10. गाडी एका जागी नको
गाडी अनेक दिवस एकाच ठिकाणी उभी असेल तर जागेवर गाडी पुढे-मागे करा, किंवा जवळच एक चक्कर मारून या. टायर एकाच ठिकाणी राहिलं तर वजन पेलणारा भाग झिजत जातो.
11. 'ट्यूबलेस'ला प्राधान्य द्या
ट्यूबलेस टायर क्वचितच पंक्चर होतं. त्यातील हवा कमी होते, मात्र दुरुस्तीला नेईपर्यंत गाडी चालवता येते. त्यामुळे, थोड्या रकमेसाठी 'ट्यूबलेस' टायर टाळू नका.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI