(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: जायकवाडी धरणातून सोडलेल्या पाण्यात तरुणाने मारली उडी; पोलिसांकडून शोधकार्य सुरु
Aurangabad News: या घटनेची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरु केले आहे.
Aurangabad News: जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्याने सद्या गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान याच गोदावरी नदीत उडी मारून एका 35 वर्षीय युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांकडून त्याचा शोधकार्य सुरु असून, पाण्याचा वेग जास्त असल्याने शोधकार्यात अडचणी येत आहेत. प्रवीण भगवान पवार ( रा. पाटेगाव, ता. पैठण) असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पैठण शहरालगत असलेल्या पाटेगाव येथील प्रवीण भगवान पवार या युवकाने शनिवारी संध्याकाळी पाच वाजता गोदावरी नदीच्या पाटेगाव पुलावरून वाहत्या पाण्यात उडी मारल्याची घटना समोर आली आहे. पुलावरून जाणाऱ्या वाहनधारकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला थांबवण्यासाठी आरडाओरडा केली,पण काही क्षणात त्यांनी त्याने उडी घेतली. त्यांनतर या घटनेची माहिती पैठण पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरु केले आहे.
शोधकार्य सुरु...
पैठण पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गोदावरी नदीत उडी मारणाऱ्या युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र जायकवाडी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदी दुधडी भरून वाहत असल्याने व रात्रीच्या अंधारामुळे वाहत्या पाण्यातील शोध कार्य थांबवण्यात आले होते. आज सकाळी अग्निशमन दलाच्या जवाना मार्फत उडी मारलेल्या युवकाचा शोध घेण्यात येत आहे. पाण्याचा विसर्ग आणि वेग पाहता शोधकार्यात अनेक अडचणी येत आहेत.
जायकवाडीतील विसर्ग सुरूच...
नाशिक जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग आणि धरण परिसरात झालेला पाऊस पाहता जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरु असेलला विसर्ग आज सहाव्या दिवशी सुद्धा सुरूच आहे. जायकवाडी धरणातून सद्या एकून 11 हजार 621 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर एकूण 18 दरवाज्यातून हा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर वरील धरणातून 17 588 क्युसेकने आवक सुरूच आहे.
प्रशासनाकडून आवाहन...
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने, पूर परिस्थिती लक्षात घेत गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर गावकऱ्यांनी नदी पात्रात जाऊ नयेत, तसेच पाण्याचा वेग जास्त असल्याने पाण्यात जाण्याचे धाडसही करू नयेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तर स्थानिक प्रशासनाला गावातच थांबण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत.