मुंबई : महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या भाजपचे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्शभूमीवर महायुतीच्या घटक पक्षांचे एकमेकांचे कार्यकर्ते स्वतःकडे खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतआहे. लोहा कंधारचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात आणि अजित पवार (Ajit pawar) यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात महत्त्वाचे भाष्य केले. आगामी निवडणुकात ह्या महायुती (Mahayuti) म्हणूनच की स्वतंत्रपणे लढायच्या याबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या निवडणुकांपूर्वीच राज्यातील महामंडळांचे वाटप होणार असून महामंडळाच्या वाटपांची जबाबदारी तिन्ही पक्षातील तीन प्रमुख नेत्यांकडे सोपविण्यात आल्याची माहितीही अजित पवारांनी दिली. त्यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही जबाबदारी सुनील तटकरे यांच्याकडे देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील भाजप कार्यकरणीतील सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. काँग्रेस माजी आमदार मोहनराव हंबरडे यांचा काही कारणास्तव आपला प्रवेश पुढे ढकलला आहे. एकमेकांचे कार्यकर्ते खेचण्यामुळे महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, येथील पक्षप्रवेशावेळी अजित पवारांनी लवकरच महामंडळांचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता महामंडळाच्या वाटपाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच हे महामंडळ वाटप करण्यात येणार असल्याचे समजते. अजित पवारांनी याबाबत नांदेडमधून माहिती दिली.
महायुतीमधील 3 नेत्यांकडे महामंडळाचे अधिकार
राज्यात लवकरच महामंडळ वाटप करणार आहोत. महायुतीत आम्ही उदय सामंत, सुनील तटकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कुणाला कोणतं महामंडळ मिळावं यासाठी चर्चा करण्याचे अधिकार दिले आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली. त्यामुळे, महामंडळाच्या वाटपाकडे डोळे लावून बसलेल्या नेत्यांनी आता पक्षातील कोणत्या नेत्याकडे जाऊन आपली बाजू समजावून सांगावी हे उघड झालं आहे. दरम्यान, शिवसेनेतील मंत्री उदय सामंत हे सध्या दावोस दौऱ्यावर असून लवकरच ते महाराष्ट्रात परतील. त्यामुळे, महामंडळांचे वाटप नेमकं कधी होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाष्य
सहकारी संस्था नीट चाललाय पाहिजे, महायुती म्हणून निवडणुका लढायच्या आहेत का असं विचारलं जात आहे. महाविकास आघाडीत असताना आम्ही हा निर्णय जिल्ह्यांवर सोडायचो आणि कुणासोबत गेलो पाहिजे याचा विचार व्हायचा. आता आम्ही महायुतीत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलू आणि काय निर्णय घ्यायचा याबाबत चर्चा करू, असे अजित पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, प्रत्येक आठवड्याला एका जिल्ह्यात जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तर, बातम्यांवर विश्वास ठेऊ नका, गैरसमज पसरवण्याच काम होतं मात्र तुम्ही त्याला बळी पडू नका. आपण शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा कायम ठेवलेली आहे, असेही अजित पवारांनी म्हटले.
हेही वाचा
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार