Maharashtra Breaking News 2 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
संजय राऊत यांची ईडी चौकशी करणार
पत्रा चाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कस्टडी सुनावण्यात आली आहे. आज सकाळी 8:30 ते 9:30 दरम्यान संजय राऊतांचे वकिल त्यांना भेटण्यास ईडी कार्यालयात आले. 9.30 नंतर ईडी त्यांच्या वकिलांसमोर चौकशी करणार आहेत.
सुप्रीम कोर्टात आज या प्रकरणावर सुनावणीची शक्यता
मुंबईतील गोरेगाव आरेत सोमवारी ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’कडून करण्यात आलेल्या वृक्ष छाटणीचे प्रकरण अखेर सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. वृक्ष छाटणीच्या नावाखाली आरेत आणि आरे कारशेडमध्ये झाडे कापण्यात आल्याचा आरोप करत या कामाविरोधात दोन याचिका दाखल झाल्या आहेत. आज या प्रकरणावर सुनावणीची शक्यता आहे.
महागाईच्या मुद्यावर राज्यसभेत चर्चा
राज्यसभेत इंधन दरवाढ, महागाई, जीएसटी, अग्निपथ योजना आदी मुद्दय़ांवर राज्यसभेत चर्चा होणार आहे.
आज नागपंचमी
आज नगपंचमी आहेय हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते. पहाटे 05:13 वाजेपासून सुरू होणार आहे. नागपंचमी तिथी समाप्ती 3 ऑगस्ट रोजी सकाळी 05:41 वाजेपर्यंत असणार आहे. या अगोदर नागदेवतेची पूजा करून घेतली पाहिजे. सकाळी 06:05 वाजेपासून ते सकाळी 08:41 वाजेपर्यंत नाग पंचमीच्या पूजेची मुहूर्त आहे. या वर्षी नागपंचमीला दोन विशेष योगही तयार होत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरंदर तालुक्यातील सासवड येथे जाहीर सभा घेऊन शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना संबोधित केले. त्यानंतर त्यांनी जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले. यावेळी यावेळी भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला.
जेजुरीला भेट देणारे एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली. यावेळी मार्तंड देवस्थानच्या वतीने एकनाथ शिंदेंना घोंगडी आणि खंडेरायाची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले. तसेच खंडोबाचा खंडा देखील एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीरंग बरणेंनी उचलला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत विजय शिवतारे, शिवाजी आढळराव पाटील, तानाजी सावंत, श्रीरंग बारणे उपस्थित होते.
Nagpur Roads : कोतवाली चौक ते गंगाबाई घाट रोडपर्यंत वाहतूक प्रतिबंधित, मनपा आयुक्तांचे आदेश
नागपूर : सीमेंट रोड बांधकामाकरिता कोतवाली चौक ते गंगाबाई घाट सी.सी. रोडपर्यंतची वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा दोन, पॅकेज 15 अंतर्गत कोतवाली चौक ते झेंडा चौक व माणिपूरा चौक ते गंगाबाई घाट सी. सी. रोड सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने 31 डिसेंबर 2022 पर्यंत उपरोक्त मार्गावरून कोणत्याही वाहतुकीस दोन्ही बाजुकडील मार्ग बंद करण्यात येणार आहे. नमूद रस्त्यावरील वाहतूक झेंडा चौक ते सक्करदरा मार्गाने दोन्ही बाजूने जाईल तसेच इतर वाहतूक अंतर्गत रस्त्यावरून वळविण्याचे मनपा आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.
Nagpur Covid Update : दिवसभरात 267 रुग्णांची कोरोनावर मात, सक्रिय बाधितसंख्या 1510वर
नागपूरः जिल्ह्यात मंगळवारी प्राप्त अहवालानुसार 267 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर 212 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात 1510 कोरोनाबाधित सक्रिय आहेत. दिवसभरात 2130 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. सध्या 66 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 1444 बाधित गृहविलगीकरणात आहेत.
शंभूराज देसाई यांच्या मतदान संघात आदित्य ठाकरे यांची सभा
शिवसेनेचे बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांच्या मतदान संघात आदित्य ठाकरे यांची सभा सुरू आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेला तुफान गर्दी झाली आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. "दोन लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ सुरू असून हे सरकार गद्दारांचे सरकार आहे, ते कोसळणार आहे. इथं आल्यानंतर इथली गर्दी पाहिल्यानंतर माझं दुःख कमी झालं, अशा भावना आदित्या यांनी व्यक्त केल्या.
मलबार हिल येथील देवगिरी बंगला अजित पवार यांनाच देण्यात येणार, शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Mumbai News : मलबार हिल येथील देवगिरी बंगला अजित पवार यांनाच देण्यात येणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मैत्री पुन्हा एकदा समोर आली आहे. अजित पवार यांनी देवगिरी बंगला कायम राहावा, यासाठी देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा पत्र लिहून विनंती केली होती. त्यानंतर आज राज्य सरकारने देवगिरी बंगला अजित पवार यांना मिळणार असल्याचा शासकीय परिपत्रक काढलं.