Maharashtra Breaking News 18 July 2022 : तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या खेड-भीमाशंकर राज्य रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा; नितीन गडकरींची घोषणा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नागपुरातील पारडी पोलीस ठाण्याअंतर्गत एका भंगाराच्या गोदामात स्फोट झाला आहे. नागपुरातील पुलगाव येथील आयुध निर्माणीतून आलेल्या भंगारात स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे.
पारडी येथील भंगार व्यापाऱ्याने पुलगाव येथील आयुध निर्माणीतून काही भंगार खरेदी करून आणले होते. भंगार व्यापाऱ्याकडील कर्मचारी त्यापैकी एक सेल कापताना त्यात स्फोट झाला आणि त्यामध्ये गुड्डू रतनेरे या 52 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
नागपूरः जिल्ह्यात दररोज कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत असून रविवारी एकाच शाळेतील 38 विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दुसरीकडे सध्या 39 कोरोना बाधितांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आल्याने नागरिकांमध्येही भितीचे वातावरण आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार 68 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. तर जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितसंख्या 1194 वर पोहोचली आहे.
तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या खेड-भीमाशंकर राज्य रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुणे जिल्ह्यातील नगर परिषद आणि महापालिकांना देण्यात आलेल्या निधीला शिंदे - फडणवीस सरकारने स्थगिती दिलीय. महाविकास आघाडी सरकारकडून पुणे जिल्ह्यासाठी 340 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी 270 कोटी रुपयांचा निधी बारामती नगरपरिषदेला, 28 कोटी पुणे महापालिकेला, साडे तेरा कोटी रुपये पिंपरी-चिंचवड महापालिकेला तर इतर नगरपरिषदांना अल्प प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला होता.
OBC Reservation : ओबीसी आरक्षणाची सुनावणी एक दिवस लांबणीवर. महाराष्ट्रातल्या दोन महत्त्वाच्या सुनावण्या 20 जुलैला एकाच दिवशी होणार आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेऊन महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेल्या राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊ नये अशी मागणी केली. राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरस्थितीने नुकसान झालेल्या शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना नुकसान भरपाई व मदतीचे तातडीने वितरण करण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदनही यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, दत्तात्रय भरणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Buldhana News : अतिवृष्टीमुळे अमरावती विद्यापीठाची आजची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. अमरावती विद्यापीठाचा पर्यावरण या विषयाचा पेपर पुढे ढकलला आहे. आज दुपारी 2.30 वाजता हा पेपर होणार होता. परंतु आता 20 जुलै रोजी परीक्षा पार पडणार आहे. पाऊस आणि अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे शक्य नसल्याने विद्यापीठाच्या प्रशासनाने हा निर्णय घेतला.
Annabhau Sathe Death Anniversary : आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी. या निमित्त आज राज्यभरातून त्यांचे अनुयायी त्यांच्या घाटकोपर येथील चिरागनगरमध्ये असलेल्या कर्मभूमीला वंदन करण्यासाठी येत असतात. याच ठिकाणी सरकारतर्फे अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. मात्र ही घोषणा प्रत्यक्षात मात्र उतरताना दिसत नाही. या स्मारकाची घोषणा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना करण्यात आली होती. तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात सदर स्मारक हे 169 कोटी रुपये खर्च करुन झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरण तयार करणार असल्याची घोषणा झाली होती. मात्र तेही सरकार पडले. आज नव्या सरकारमध्ये समर्थन दिलेले शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी या अण्णाभाऊ साठे यांच्या घराला भेट देत दर्शन घेतले. यावेळी आपण या समाजातील नेतेमंडळी आणि साठे कुटुंबियांना घेऊन विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जात असून हा स्मारकाचा विषय तात्काळ मार्गी लावणार असल्याचे सांगितले.
Annabhau Sathe Death Anniversary : आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी. या निमित्त आज राज्यभरातून त्यांचे अनुयायी त्यांच्या घाटकोपर येथील चिरागनगरमध्ये असलेल्या कर्मभूमीला वंदन करण्यासाठी येत असतात. याच ठिकाणी सरकारतर्फे अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. मात्र ही घोषणा प्रत्यक्षात मात्र उतरताना दिसत नाही. या स्मारकाची घोषणा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना करण्यात आली होती. तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात सदर स्मारक हे 169 कोटी रुपये खर्च करुन झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरण तयार करणार असल्याची घोषणा झाली होती. मात्र तेही सरकार पडले. आज नव्या सरकारमध्ये समर्थन दिलेले शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी या अण्णाभाऊ साठे यांच्या घराला भेट देत दर्शन घेतले. यावेळी आपण या समाजातील नेतेमंडळी आणि साठे कुटुंबियांना घेऊन विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जात असून हा स्मारकाचा विषय तात्काळ मार्गी लावणार असल्याचे सांगितले.
Ratnagiri News : पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात आज शिवसेनेकडून रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे इथे भात लावणी करण्यात आली. पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सबंधित खात्याचे अधिकारी काय करत आहेत, असा सवालही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विचारला. महामार्गावर आंदोलन करताना तालुकाप्रमुख संदीप सावंत आणि कार्यकर्त्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांची गाडी अडवून या पडलेल्या खड्ड्यांविषयी जाब विचारला.
Kalyan-Dombivli News : कल्याण डोंबिवलीत कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. कल्याण पूर्वेकडील ड आणि जे प्रभागातील कचरा ठेकेदाराच्या माध्यमातून उचलला जातो. मात्र ठेकेदाराने तीन महिन्यांपासून कामगारांचा पगार न दिल्याने आज सकाळपासून ठेकेदाराच्या कामगारांनी सकाळपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. कल्याण पूर्वेकडील ड आणि जे प्रभागातील कचरा ठेकेदाराच्या माध्यमातून उचलला जातो. कामगारांनी आपण ठेकेदाराकडे पगाराची वारंवार मागणी करुन देखील मागील तीन महिन्यापासून आपल्याला पगार मिळालेला नसल्याचे सांगितले. दिवसभर काम करुन जर हक्काचा पगार मिळत नसेल तर घर कसे चालवायचे असा सवाल कामगारांनी केला आहे. दरम्यान या आंदोलक कामगारांच्या वतीने माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी प्रशासनाला जाब विचारला. ठेकेदाराकडून कायमच कर्मचाऱ्यांचा पगार रोखला जात असल्याने प्रशासनाने कामगारांच्या खात्यात थेट पगाराची रक्कम जमा करावी अशी मागणी केली आहे. तसेच प्रशासनाने ठेकेदाराला समज न दिल्यास शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येला प्रशासनाला जबाबदार धरले जाईल असा इशारा देखील दिला आहे.
Ashadhi Wari 2022 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात प्रवेश केला आहे. रविवारी 10 तारखेला आषाढी एकादशी झाल्यानंतर बुधवारी गुरुपौर्णिमेलाचा गोपाळ काला करून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाली. यंदाचा हा 275 वा पालखी सोहळा होता. या सोहळ्यात एकूण 450 दिंड्या सहभागी झाल्या होत्या. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही 23 जुलै रोजी आळंदीत दाखल होणार आहे. सातारा जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात प्रवेश करताना माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले. आणि नंतर पालखी आळंदीच्या दिशेनं मार्गस्थ झाली.
नागपूर जिल्हा परिषदेत अनेक गैरव्यवहार सुरु आहेत. यापैकी सुरक्षा ठेव घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने 2014-2015 पासून या प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र सहा महिने उटलूनही चौकशी सुरुच करण्यात आली नाही. त्यामुळे प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका होत आहे. जर स्थायी समितीच्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी होत नसेल तर फायदा काय? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात येत आहे.
सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.
नागपुरात हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तुझ्यासाठी सरप्राईज असल्याचे सांगून चिखलदरा येथे नेऊन पोलिस उपनिरीक्षकाने बलात्कार केला. नागपुरात परतल्यावर तिने आई-वडीलांना आपबिती सांगितल्यावर सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत त्या उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली. ही घटना 13 जुलै रोजी घडली.
सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.
राज्यातील सहकारी संस्था निवडणुकीवरील स्थगिती उठवण्याची शक्यता आहे. उमेदवाारी अर्ज भरलेल्या ठिकाणी स्थगिती उठवली जाण्याची शक्यता आहे. स्थगिती उठवण्याबाबत विरोधक आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चा झाली. अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. या निवडणुकीला मतदानाच्या आदल्या दिवशी स्थगिती देण्यात आली होती. राज्यामध्ये सर्वदूर पावसाचे थैमान सुरू असल्याने अनेक ठिकाणी महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे राज्यातील आता सहकारी संस्थांच्या निवडणुकाही लांबणीवर गेल्या आहेत. यासंदर्भात राज्य सरकारकडून अध्यादेश जारी करण्यात आला आहे.
Mumbai News : फायनान्शियल कंपनीतील कर्मचाऱ्याला परवानाधारक शस्त्र दाखवून धमकावल्याप्रकरणी मुंबईतील वरळी येथील रहिवाशाला अटक करण्यात आली आहे. संबंधित कर्मचारी कर्जाची वसुली करण्यासाठी आरोपीच्या घरी आला होता. वरळी पोलिसांनी आरोपी बच्चन खान (वय 52 वर्षे) या वरळी येथील व्यापाऱ्याला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, "तक्रारदार प्रकाश माळी हे एका फायनान्शियल कंपनीचे कर्मचारी असून ते कर्जाची वसुली करण्यासाठी शुक्रवारी (15 जुले) खान्स फ्लॅटवर गेले होते. खानने त्याला घरात ओढले, शिवीगाळ केली आणि 'दोबारा पैसा मांगा तो इधर ही ठोक डालूंगा' म्हणत शस्त्राने धमकावले." वरळी पोलिसांनी खानला अटक केली असून त्याच्याकडून परवाना रिव्हॉल्व्हर आणि आठ काडतुसे जप्त केली आहेत. त्याचा परवाना रद्द करण्यासाठी पोलीस आता शहर पोलीस प्रमुखांना पत्र लिहिणार आहेत.
भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. यंदा एनडीएकडून द्रौपदी मूर्म आणिा युपीएकडून यशवंत सिन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मू यांना विक्रमी मते मिळणार असल्याचा विश्वास भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केला. पक्षमर्यादा झिडकारुन आज द्रोपदी मुर्मु यांच्या समर्थनात मतदान होईल असे सूचक वक्तव्य ही त्यांनी केले आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Amravati News : अमरावतीच्या परतवाडा-बैतुल महामार्गावर निंभोरा फाट्याजवळ रात्री उशिरा भीषण अपघात झाला. चारचाकी आणि दुचाकीमध्ये अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बोदड, खरपी, बहिरम येथील असल्याचे समजते. शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीत हा अपघात झाला.
मृतांची नावे...
1. पांडुरंग रघुनाथ शनवारे (वय 30 वर्षे) रा. बोदड ता चांदूर बाजार
2. सतीश सुखदेव शनवारे (वय 30 वर्षे) रा. बहिरम कारंजा
3.सुरेश विठ्ठल निर्मळे (वय 25 वर्षे) रा. खरपी.
4. Innova चालक रमेश धुर्वे (वय 30 वर्षे) रा. सालेपूर
5. MH-27-S-4670 होंडा स्प्लेंडरचा चालक नाव प्रतीक दिनेशराव मांडवकर (वय 26 वर्षे)
6 अक्षय सुभाष देशकर (वय 26 वर्षे) रा. बोदड ता चांदूर बाजार
नागपूरः नागपुरात हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तुझ्यासाठी सरप्राईज असल्याचे सांगून चिखलदरा येथे नेऊन पोलिस उपनिरीक्षकाने बलात्कार केला. नागपुरात परतल्यावर तिने आई-वडीलांना आपबिती सांगितल्यावर सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत त्या उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली. ही घटना 13 जुलै रोजी घडली होती.
राज्यभरात पावसानं (Rain Updates) धुमाकूळ घातला असला तरी मुंबईत मात्र कालपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. पण काही काळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हवामान खात्याकडून मुंबईला पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता. पण, आठवड्याच्या शेवटी मात्र पावसानं विश्रांती घेतली आहे. गेल्या आठवड्यात कोसळलेल्या पावसामुळं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांतील पाणी पातळी वाढली असून मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाची पातळी आता आवश्यकतेच्या 82 टक्के इतकी आहे, तर तीन तलावही ओसंडून वाहत आहेत.
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा आलेख वाढताना पाहायला मिळत असताना आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 935 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तुलनेनं कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात मागील चार दिवस दररोज वीस हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. पण आज कोरोना रुग्णांचा आलेख घसरला आहे. रविवारी दिवसभरात 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Dhule News : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर गावात दोन गटात तणाव निर्माण झाला असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आपल्या कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी दाखल झाले आहेत. सध्या निजामपूर गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त मात्र कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
Vasai Potholes News : मुंबई-अहमदाबाद महामार्ग खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्गावर जागोजागी फूट-दोन फूट रुंद तर फूटभर खोल गोल खड्डे पडल्यामुळे भरगाव वेगात जाणाऱ्या वाहनांचे अपघात होत आहेत. विरार हद्दीतील खाणीवडे टोल नाक्याजवळ रात्री 12 च्या सुमारास खड्ड्यात चाक गेल्याने एका कारचा अपघात होऊन कार चालक जखमी झाला. सकवार गावाचा सामाजिक कार्यकर्ता विक्की ठक्कर यांनी पोलिसांच्या मदतीने अपघातग्रस्त कारचालकाला रुग्णवाहिका बोलावून जखमीला दवाखान्यात पाठवून स्वत: मित्रांच्या मदतीने मध्यरात्री खड्डे बुजविले आहेत. वसई फाटा, नालासोपारा फाटा, पेल्हार, खानिवडे टोल नाक्याजवळच्या परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. आयआरबी, टोल नाका प्रशासन मात्र या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने वाहनधारकांमध्ये मात्र तीव्र संतापाचं आणि नाराजीचं वातावरण आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा पुरंदर तालुक्यातील वाल्हे या ठिकाणी असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घातले जाईल. पंढरपूरला जाताना आणि पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परतीच्या प्रवासावेळी देखील नीरा स्नान घातले जाते.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल आश्रम या ठिकाणी 40 जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या सर्वांवर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
उत्तर ओडिशा भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आणि गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो. किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग देखील अधिक असणार. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज गोंदिया आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पनीर, दूध, लस्सी असे पदार्थ, स्टेशनरी वस्तू, किराणा माल आदी गोष्टी आजपासून महागणार आहेत. या गोष्टींना जीएसटीतून देण्यात आलेली सूट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापाऱ्यांनी विविध मार्गांनी या निर्णयाला विरोध केला आहे.
Presidential Election 2022 : लवकरच भारताला नवे राष्ट्रपती मिळतील. राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान पार पडणार आहे. या मतदानाचा निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे. त्यानंतर 25 जुलै रोजा नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल. संसदेत मतदानाच्या प्रक्रियेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. संसद भवनातील खोली क्रमांक 63 मध्ये मतदानासाठी 6 बूथ उभारण्यात आले आहेत. यामध्ये एक बूथ दिव्यांग वोटरसाठी असेल. वेगवेगळ्या राज्यांचे नऊ आमदार संसद भवनामध्ये मतदान करतील, यामध्ये उत्तर प्रदेशमधील 4, त्रिपुरामधील 2, आसाममधील एक, ओडिशामधील एक आणि हरयाणातील एका आमदाराचा समावेश आहे. तर 42 खासदार विधानसभेत मतदान करतील.
Parliament Monsoon Session : संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) आजपासून सुरू होत असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या पावसाळी अधिवेशनात (Monoon Sesion) एकूण 18 बैठका होणार असून 24 विधेयकं मांडली जाणार आहेत. पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारनं रविवारी 17 जुलै रोजी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत (All Party Meeting) विरोधी पक्षांनी सुमारे 25 मुद्द्यांवर सरकारशी चर्चा करण्याची मागणी केली. सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान मोदी (PM MOdi) गैरहजर होते या मुद्द्यावरुन काँग्रेसनं भाजपला घेरत, खिल्ली उडवली आणि काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी मोदींवर टीकास्त्र डागलं. 12 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रपती (Presidential Election) आणि उपराष्ट्रपती (Vice Presidential Election) या दोन्ही महत्त्वाच्या घटनात्मक पदांसाठीही निवडणुका होणार आहेत.
पार्श्वभूमी
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
आज राष्ट्रपतीपदाची निवडणूक
राष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना तर विरोधकांकडून यशवंत सिन्हांना उमेदवारी देण्यात आली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदार आणि सगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेतील आमदार राष्ट्रपती पदासाठी मतदान करणार आहेत. प्रेफरन्शियल व्होटिंगद्वारे ही मतदान प्रक्रिया पार पडते. सकाळी10 ते संध्याकाळी 5 या वेळेत संसदभवन आणि राज्यांच्या विधिमंडळात मतदान पार पडेल. शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांचा मुक्काम काल रात्रीपासून ट्रायडंट हॉटेलमध्ये आहे. गेले दोन दिवस मतदानाबाबत शिंदे गट- भाजपाच्या बैठका सुरु आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांची सकाळी 9 वाजता विधान भवनात बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला अजित पवार आणि जयंत पाटील मार्गदर्शन करतील.
संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. सरकारकडून अधिवेशनात 24 नवीन विधेयकं मांडली जाणार आहेत. दोन्ही सभागृहांचं कामकाज सकाळी 11 वाजता सुरु होणार आहे. पंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता संसद भवनात दाखल होतील आणि माध्यमांशी संवाद साधतील. अधिवेशनात अग्नीपथ, असंसदीय शब्दांची यादी, संसद परिसरातील आंदोलनांना बंदी या विषयांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
आज जगदीप धनकड उपराष्ट्रपती पदासाठी नामांकन अर्ज भरणार
एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनकड आज सकाळी 10.30 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विरोधकांकडून मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. मार्गारेट अल्वा 19 जुलैला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
आजपासून खाद्यपदार्थ आणि घरगुती वापराच्या वस्तू महागणार
पनीर, दूध, लस्सी असे पदार्थ, स्टेशनरी वस्तू, किराणा माल आदी गोष्टी आजपासून महागणार आहेत. या गोष्टींना जीएसटीतून देण्यात आलेली सूट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापाऱ्यांनी विविध मार्गांनी या निर्णयाला विरोध केला आहे.
थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा इशारा
उत्तर ओडिशा भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आणि गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो. किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग देखील अधिक असणार. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज गोंदिया आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पंढरपूरमध्ये 40 जणांना विषबाधा
पंढरपूर येथील श्री विठ्ठल आश्रम या ठिकाणी 40 जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या सर्वांवर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा पुरंदर तालुक्यातील वाल्हे या ठिकाणी असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घातले जाईल. पंढरपूरला जाताना आणि पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परतीच्या प्रवासावेळी देखील नीरा स्नान घातले जाते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -