16 March 2022 Breaking News LIVE Updates : देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपची महत्वपूर्ण बैठक
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Vaccination For Children : 12 ते 14 वयोगटातील मुलामुलींचं आजपासून लसीकरण
12 to 14 years Vaccination : आजपासून 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला (Corona Vaccination) सुरूवात होत आहे. 12 वर्ष पूर्ण ते 14 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबईतील 12 केंद्रांवर 2 दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी 12 वाजल्यापासून लसीकरण सुरु होणार आहे.. लाभार्थ्यांना Corbevax या लसीचे 2 डोस 28 दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारकडून 12 ते 14 या वयोगटातील लहान मुलांसाठी हे लसीकरण सुरू होणार आहे. लहान मुलांना बायोलॉजिक ईएस कोर्बोवॅक्स कंपनीची लस दिली जाण्याची शक्यता आहे. एनटीएजीआयने 12 ते 14 या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याची शिफारस केली होती.
भारतात 12-14 वर्षांच्या मुलांना जास्त धोका?
लसीकरण सुरू होण्यापूर्वी, कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष आणि लसीकरणावरील नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) यांनी सांगितले होते की, आम्ही 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले आहे कारण त्यांना जास्त धोका आहे. ते म्हणाले, "चीन आणि सिंगापूरमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. प्रौढ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असले तरी कोणतीही हलगर्जीपणा धोकादायक ठरू शकतो.
Milk Price Hike : 'महागाईचे चटके', महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ
Milk Price Hike : आधी पेट्रोल, डिझेलनंतर गॅस या सगळ्याच गोष्टी महाग होत असताना पुणेकरांना आणखी एक महागाईचा फटका बसला आहे. या सगळ्याबरोबरच आता दूध देखील महाग झाले आहे. महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज दुधाच्या खरेदीत तीन रुपये तर विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. राज्यभर गाईच्या दूध खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटर प्रत्येकी तीन आणि दोन रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय राज्यातील सहकारी व खासगी दूध उत्पादक संघांकडून घेण्यात आला आहे.
ग्राहकांना प्रति लिटर दूधामागे आता दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून जे दूध संघ दूध खरेदी करतात त्या शेतकऱ्यांना तीन रुपये प्रतिलिटर वाढवून देण्यात येणार असल्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला आहे. या नव्या निर्णयामुळे आता गाईच्या दुधाचा खरेदीदर प्रतिलिटर 33 रुपये तर, पिशवीबंद दुधाचा किरकोळ विक्री दर प्रतिलिटर 52 रुपये असणार आहे. या दूध दरवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी 15 मार्चपासून करण्यात आली आहे
Raigad News : दहा लाख रुपयांची खंडणी मागत ठार मारण्याची धमकी देणाऱ्या चौघांना अटक
दहा लाख रुपयांची खंडणी मागत जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. जेएसडब्ल्यू कंपनीच्या अधिकाऱ्याकडे ही दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करत खंडणीची मागणी करण्यात आली होती. गणेश पोळ, जीवन महापुरे, महेंद्र बनसोडे, मुरलीधर पाटील यांना वडखळ पोलिसांनी अटक केली आहे.
पर्यावरणपूरक होळीच्या आयोजनातून आनंदाची धुळवड साजरी करू या- मुख्यमंत्री
पर्यावरणपूरक होळीचे आयोजन आणि नैसर्गिक रंगांची उधळण करत आनंदाची धुळवड साजरी करूया असे आवाहन करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळीमध्ये वाईट विचार आणि कृतीचे दहन केले जाऊन सुविचारांची पेरणी केली जाते. हीच परंपरा आपण विविध स्वरूपात पुढे नेत असतो. २१ मार्च हा दिवस आपण जागतिक वन दिन म्हणून साजरा करतो. आपण ज्याला वातावरणीय बदलाचे परिणाम म्हणतो आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर भाष्य करतो तेंव्हा त्याची सगळी उत्तरे आपल्याला “वनात” मिळतात. आपल्याला आरोग्यसंपन्न आयुष्याचा निरोगी श्वास देणारी ही सृष्टी आता दृष्टीआड करून चालणार नाही. त्यामुळेच जेंव्हा आपण होलिका दहनाचा विचार करतो तेंव्हा त्यासाठी वृक्षतोड होणार नाही, निसर्गरंगांची जपणूक होईल, याची काळजी घेणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
Maharashtra News : देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपची महत्वपूर्ण बैठक
Maharashtra News : कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभा निवडणुक उमेदवार याबाबत भाजपाच्या नेत्यांची बैठक झाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुन्ना महाडीक, अमल महाडीक यांच्या समवते नेत्यांची बैठक सुरू आहे. उमेदवार कोण द्यायचा याबाबत खलबते होणार आहे.
Nanded News : हिमायतनगर-भोकर कार दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृ्तयू
नांदेडच्या हिमायतनगर-भोकर राष्ट्रीय महामार्गाचे काम झाल्यानंतर आता वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहनांचा वेगही अधिक असल्याने भरधाव वेगात भोकरकडून हिमायतनगरकडे येणाऱ्या कारने दुचाकीला जबर धडक दिल्याने, दोघेजण जागीच ठार झाले असून दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
Sangli District Bank News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेप्रकरणी मुंबईत तातडीची बैठक सुरु
Sangli District Bank News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेप्रकरणी मुंबईत तातडीची बैठक सुरू झाली आहे. पालकमंत्री जयंत पाटील हे या बैठकीला उपस्थित आहे. दि महाराष्ट्र स्टेट को-आॅप बॅंक लि., मुंबई फोर्ट परिसरातील मुख्यालयात बैठक सुरु आहे. बॅंकेतील काही संचालक सदस्यांची देखील बैठकीला उपस्थिती आहे.