Maharashtra Breaking News 14 July 2022 : देवेंद्र फडणवीस शुक्रवारी राज ठाकरे यांची भेट घेणार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
पुढील 48 तासांत राज्यात जोरदार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी
राज्यात पुढच्या 48 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पालघर, पुणे शहर, गडचिरोली, या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे..
कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
रेड अलर्ट – पालघर, नाशिक, पुणे
ऑरेंज अलर्ट – मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर
यलो अलर्ट – नंदुरबार, धुळे, जळगाव. अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
उद्धव ठाकरे घेणार जिल्हाप्रमुखांची बैठक
शिवसेनेपासून शिंदे गट वेगळा झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने बैठका घेत आहेत. आज दुपारी 12 वाजता राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक शिवसेना भवनात होणार आहे.
एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू आज मुंबईत
एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मूर्मु आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदार सोबत त्यांची बैठक होणार आहे. ही बैठक अंधेरी येथील हॉटेल लीला येथे होणार आहे.
पावसाच्या अलर्टमुळे पुणे, ठाणे, रायगड, नवी मुंबईतील शाळा बंद
पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा 17 जुलै पर्यंत बंद राहणार आहेत. तसेच ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नवी मुंबईतील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढला
अलमट्टी धरणातून 1 लाख 25 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील वाढत असलेल्या पावसाचा अंदाज घेऊन अलमट्टी धरण प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवल्यामुळे सांगली, कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र धरणाच्या पुढील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाबळेश्वरातून कोकणाकडे जाणारा आंबेनळी घाट आज बंद
महाबळेश्वरातून कोकणाकडे जाणाऱ्या आंबेनळी घाट आज बंद रहाणार आहे. घाटात तुरळक पडलेले दरडी आणि पाण्याच्या प्रवाहाने रस्त्यावर आलेले दगडधोंडे बाजूला काढण्यासाठी घाट बंद रहाणार आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठीही घाटातील धोकादायक दरडी हटवल्या जणार आहेत. यासाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घाट बंद रहाणार आहे.
भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरा सामना
भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतला दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. मालिकेत पहिला सामना भारताने जिंकला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ इंद्र मणी
भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली येथील संशोधन सहसंचालक प्रा. इंद्र मणी यांची परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि.१४) डॉ इंद्र मणी यांची नियुक्ती जाहीर केली. कुलगुरू डॉ अशोक ढवण यांचा कार्यकाळ दिनांक ६ मे २०२२ संपल्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. डॉ इंद्र मणी यांनी भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथून कृषी अभियांत्रिकी या विषयात एम.एससी. व पीएच.डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन, प्रशासकीय कार्य व कृषी विस्तार सेवेचा व्यापक अनुभव आहे. कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी प्रा. जगमोहन सिंह राजपुत, निवृत्त महासंचालक, एनसीईआरटी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. भारतीय कृषि संशोधन संस्थेचे संचालक डॉ ए के सिंह व राज्याच्या कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवळे हे सदर समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ इंद्र मणी यांच्या निवडीची घोषणा केली.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे काही मुख्य चौकात जमावबंदीचे आदेश..
उद्या अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे काही मुख्य चौकात जमावबंदीचे आदेश..
अमरावती येथे घडलेल्या उमेश कोल्हे आणि उदयपूर येथे घडलेल्या हत्येचा निषेध करण्यासाठी शक्ती फाउंडेशन तर्फे परतवाडा येथील जयस्तंभ चौक येथे जमा होऊन राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्या नावाने मोठ्या संख्येने पोस्टकार्ड पाठवून आंदोलन केल्या जाईल..
परतवाडा पोलीसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली..
अचलपूर आणि परतवाडा हे शहर संवेदनशील असल्याने इथली स्थिती शांत आणि नियंत्रित राहावी म्हणून जमावबंदी आदेश...
अचलपूर उपविभागीय अधिकारी यांनी केले प्रतिबंधात्मक आदेश जारी..
कोपरखैरणे पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगाराला केली अटक
कोपरखैरणे बस डेपो जवळ एक इसम पिस्तूलासह येणार असल्याची माहिती कोपरखैरणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोपरखैरणे बस डेपो परिसरात दोन पथकांच्या सहाय्याने सापळा रचून एका इसमास ताब्यात घेतले. पोलिसांनी तात्काळ त्याच्या कमरेवर असलेले एक रिव्हॉल्व्हर ताब्यात घेत त्याला अटक केली. पोलीस ठाण्यात अधिक चौकशी केली असता सदर इसमाचे नाव ऋषीकेश जायभाये असून त्याच्याकडे असलेल्या आणखी 2 पिस्तुल आणि एक मोटारसायकल देखील ताब्यात घेण्यात आली. आरोपी विरोधात अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरूध्द कोपरखैरणे पोलीस ठाण्यात यापुर्वी तीन गुन्हे दाखल आहेत.
देवेंद्र फडणवीस शुक्रवारी राज ठाकरे यांची भेट घेणार
देवेंद्र फडणवीस उद्या सकाळी 11 वाजता राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ येथील निवासस्थानी दोघांची भेट होईल. दोन दिवसांपूर्वी पावसामुळे ही भेट रद्द झाली होती.
कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला पुन्हा धक्का
कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडानंतर शिवसेनेला खिंडार पडल्याचं दिसून येतय.शिंदे यांच्या बंडानंतर कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेत संभ्रमाचे वातावरण आहे .ठाणे नवी मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवलीमधील अनेक नगरसेवक , पदाधिकारी शिंदे गटात सामिल झाले आहे.त्यानंतर आता कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे देखील आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत .