Marathi Bhasha Gaurav Din : आज मराठी भाषा गौरव दिन, राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन
Marathi Bhasha Gaurav Din : आज 27 फेब्रुवारी. आजचा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' (Marathi Bhasha Gaurav Din) म्हणून साजरा केला जातो.
Marathi Bhasha Gaurav Din : आज 27 फेब्रुवारी. आजचा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' (Marathi Bhasha Gaurav Din) म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज (Kusumagraj) यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला. परंतु, याच दिवसाला अनेक जण 'मराठी राजभाषा दिन' असेही म्हणतात. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 10 एप्रिल 1997 रोजी काढलेल्या परिपत्रकात 1 मे हा 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसा तो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून 1 मे रोजी साजरा करण्यात येत होता. परंतु, कालांतराने तो विस्मृतीत गेला. त्यामुळे शासनाला पुन्हा परिपत्रक वाढावं लागलं.
राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन
दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. भारतामध्ये मराठी भाषिकांची संख्या ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे आपुलकी वाटणारी जिव्हाळ्याची मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा मराठी आहे. दरम्यान, जागतिक मराठी भाषा दिवसनिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाकरे गटाकडून जागर मराठी भाषेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्यावतीने कार्यक्रम पार पडणार आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत.
राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत
नवी मुंबईत मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत होणार आहे. पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ही मुलाखत असणार आहे. तसेच मिरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त भव्य ग्रंथ दिंडी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलं आहे. नाशिक-मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथ दिंडी. नाशिक मनपा, सार्वजनिक वाचनालय, कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं मराठी भाषा दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे उपस्थित राहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: