Maharashtra Live blog: उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा प्रयत्न?
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog updates: मिरारोड पोलीस ठाण्यातच काही नशेत असलेल्या तरुणांनी सिगारेट ओढत व्हिडिओ तयार केला आणि तो समाजमाध्यमांवर पोस्ट केल्याने पोलिस विभागाची मोठी फजिती झाली आहे. या घटनेनंतर तिन्ही तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित अधिकारी आणि ठाणे अंमलदार यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. मारहाणीच्या प्रकरणात काही तरुणांना चौकशीसाठी मीरारोड पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. चौकशी सुरू होण्यापूर्वी त्यांना तात्पुरते ठाण्यातील स्टोअर रूममध्ये ठेवण्यात आले होते. त्याचदरम्यान, नशेच्या अवस्थेत असलेल्या या तरुणांनी सिगारेट ओढत ठाण्याच्या आतच व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर टाकला.
हा व्हिडिओ काही तासांतच व्हायरल झाल्याने शहरभरात खळबळ उडाली. “पोलीस ठाण्याच्या चार भिंतींच्या आत असा प्रकार कसा घडू शकतो?” असा प्रश्न नागरिक आणि स्थानिकांकडून उपस्थित करण्यात आला. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही घटना अतिशय गंभीर मानली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात मीरारोड पोलिसांनी तिन्ही तरुणांना अटक करून त्यांच्यावर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष केल्याबद्दल संबंधित अधिकारी आणि ठाणे अंमलदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिस ठाण्यांतील सुरक्षा व देखरेख प्रणालीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाण्यातील देखरेख कडक करण्याचे आदेश दिले आहेत.
दारूच्या दुकानात चाकूने भोसकून हत्या, युवकाच्या हत्येने देगलूर हादरल
नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात आज सकाळी देशी दारूच्या दुकानात एक हत्या झालीय. शादुल शेख नावाच्या युवकावर शेख निसार या युवकाने चाकूने वार केले, हे वार इतके गंभीर होते की शादुल शेखचा जागीच मृत्यू झाला. यातील आरोपीला देगलूर पोलिसांनी अटक केली असून हत्येच्या कारणांचा अद्याप उलगडा झाला नाही.या घटनेने शहरात प्रचंड दहशत पसरली असून घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. यातील आरोपी हा नशेच्या अंमलाखाली असून त्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे
मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांमुळे तीन वाहनांचा अपघात; एयर बॅग उघडल्यामुळे प्रवासी बचावले
मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर शहराजवळ कोकणाकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीन वाहनांचा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. महामार्गावरील इंदापूर जवळ असलेल्या कशेने गावाजवळ पडलेल्या खड्ड्यांमुळे हा विचित्र अपघात घडल्याची घटना समोर आली आहे.या खड्ड्यात एका कार चालकाने खड्ड्यांचा अंदाज घेता अचानक ब्रेक मारला, मात्र मागून वेगवान येणारी दोन वाहने या कार वर आदळली आणि हा अपघात घडला. या अपघातात तिन्ही कारचे मोठे नुकसान झाले असून एअर बॅग उघडल्यामुळे या वाहनातील प्रवाशी बालंबाल थोडक्यात बचावले आहेत. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली आहे.मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर शिंदेच्या सेनेकडून संताप व्यक्त करण्यात आला असून लवकरात लवकर खड्डे बुजवा अन्यथा कार्यालय फोडू असा इशारा संबंधित विभागाला देण्यात आला आहे.























