Maharashtra Live blog updates: शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज चक्काजाम आंदोलन
Maharashtra Live blog updates: शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज चक्काजाम आंदोलन होणार आहे. या घडामोडींसह राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
LIVE

Background
Maharashtra Live blog updates: शक्तीपीठ महामार्गाविरोधात (Shaktipeeth Mahamarg) पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज चक्काजाम आंदोलन होणार आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सर्व जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय. कोल्हापुरातील आंदोलनात शेतकरी नेते राजू शेट्टी स्वत:त सहभागी होणार आहेत. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे . शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादू नका, अशा तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. तर त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारने रद्द केल्यावर आता 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा काढणार आहेत. ठाकरे येत आहेत अशी टॅगलाईन देत शिवसेनेनं पोस्टही केलीय. या मेळाव्याच्या नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. या घडामोडींसह राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
शहापूर तालुक्यात विद्यार्थ्यांचा एस.टी. बससमोर ठिय्या
शहापूर : तालुक्यातील सारंगपुरी, मुरबीचापाडा, अवकळवाडी, कोठारे, पोकळ्याचीवाडी व जळक्याचेवाडी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी आज धसई येथे एस.टी. महामंडळाची बस अडवून तीव्र आंदोलन छेडले. या मार्गावर बसची संख्या कमी असून प्रवासी संख्या मोठी असल्याने विद्यार्थ्यांना दररोज प्रवासात अडथळा येतो. बसमध्ये चढता न आल्याने आज संतप्त विद्यार्थ्यांनी बससमोर ठिय्या देत आंदोलन केले व या मार्गावर तात्काळ अतिरिक्त एस.टी. बस सुरू करण्याची मागणी केली. प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात भंडाऱ्यात ख्रिस्ती बांधवांचं आंदोलन
भंडारा : ख्रिस्ती धर्मगुरू पास्टर व सेवक यांना जीवे मारण्याची सुपारी देण्याची भाषा वापरणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात भंडाऱ्यात ख्रिस्ती बांधवांनी आंदोलन केलं. त्रिमूर्ती चौकात एकत्र आलेल्या बांधवांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. राज्य सरकारनं समाजासमाजात तेढ निर्माण करणाऱ्या पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करण्यात आली. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना ख्रिस्ती बांधवांनी याबाबत निवेदन दिलं.























