सांगलीतील कवठेपिरान गावात कमाल, पत्नी सरपंच तर पती उपसरपंच पदावर बिनविरोध!
Sangli Gram Panchayat : सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान ग्रामपंचायतमध्ये मात्र सरपंच -उपसरपंच पदावर पत्नी-पतीची निवड झाली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार पती-पत्नीकडे असलेली महाराष्ट्रामधील बहुदा ही एकमेव ग्रामपंचायत असावी.
सांगली : महाराष्ट्रत सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. यात अनेक गावामध्ये सरपंच होण्याची अनेकांची इच्छा पूर्ण झाली तर कुणाची उपसरपंच होण्याची. सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान ग्रामपंचायतमध्ये मात्र सरपंच -उपसरपंच पदावर पत्नी-पतीची निवड झाली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार पती-पत्नीकडे असलेली महाराष्ट्रामधील बहुदा ही एकमेव ग्रामपंचायत असावी.
सांगलीतील मिरज तालुक्यातील कवठेपिरान ग्रामपंचायतीचा सगळा कारभार एका जोडीकडे गेलाय. ती जोडी म्हणजे भीमराव माने आणि अनिता माने. हे पती-पत्नी सध्या चर्चेत आहे. त्याला कारण देखील तसेच आहे. अनिता माने कवठेपिरान गावच्या सरपंच झाल्यात तर त्याचे पती भीमराव माने उपसरपंच. ग्रामपंचायतीचा सगळा कारभार या जोडीकडे. तसे भीमराव माने यांनी यांच्या अगोदर गावचा सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य ही पदे भूषवली आहेत.
ते सरपंच असताना तंटामुक्त योजनेत , निर्मल ग्राम योजनेत गावाचा अनेकवेळा नंबर लागलाय. यातून कोट्यवधीची बक्षिसे गावाला मिळालीत. यामुळे भीमराव माने याची सरपंच पदाची कारकीर्द तशी गाजलेली. कवठेपिरान हे गाव तसे हिंदकेसरी पै.मारुती माने यांचे गाव म्हणून ओळखले जाते. माने कुटुंबाची गेल्या 50 वर्षांपासून कवठेपिरान गावात सत्ता आहे. त्यांचे पुतणे भीमराव माने हे गेल्या 25 वर्षांपासून गावाचे नेतृत्व करतात.
आदर्श सरपंच म्हणून भीमराव माने यांची ख्याती आहे.माने यांच्या नेतृत्वाखाली गावाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि तंटामुक्त अभियानात पहिला क्रमांकसुद्धा मिळवला आहे. तर भिमराव माने यांनी हे जिल्हापरिषद सदस्य म्हणून सुद्धा काम पाहिले आहे. त्यामुळे माने कुटुंबाच्या नेतृत्वाखाली बिनविरोध अनेक वर्षे गावाचा कारभार चालतो.