(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Karnataka Dispute 'अन्यथा मला कर्नाटकात यावे लागेल', संभाजीराजे छत्रपतींचा कर्नाटक सरकारला इशारा
Maharashtra Karnataka Dispute : बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाचे वातारण आहे.
Maharashtra Karnataka Dispute : बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली असून यावरून आता राज्यातील नेते आक्रमक झाले आहेत. या घटनेनंतर अनेक राजकीय नेते वेगवेगळ्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देत आहेत. यातच माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आपली प्रतिक्रिया देत या घटनेचा निषेध केला आहे. संभाजीराजेंनी ट्वीट करत म्हटलं आहे की, ''छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल.'' त्यांनी कर्नाटक सरकारला इशारा देत म्हटलं आहे की, ''रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत. त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल.''
छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत,त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 6, 2022
संजय राऊतांच्या शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
यावरच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही आपली प्रतिक्रिया देत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र पेटला तर सरकारला भारी पडेल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. ते म्हणाले आहेत की, राज्य सरकार डोळे मिटून बसलं आहे. राऊत म्हणाले की, स्वाभिमान, अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान, आपल्या लोकांविषयी प्रेम आहे की नाही. पुण्यात शिवसैनिकांनी आंदोलन केलं आहे. महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या शिवसैनिकांना शिंदे-फडणवीस सरकारचे पोलीस लाठ्या काठ्यांनी मारहाण करत आहेत. कोल्हापुरातही तेच सुरु आहे. तुम्ही कोणाचं काम करत आहात, असा प्रश्न राऊत यांनी राज्य सरकारला केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत राऊत म्हणाले आहेत की, या घटनेनंतर सरकार काय करत आहे. मुख्यमंत्री कुठे आहेत? जे सांगतात आम्ही त्या काळात बेळगावात जाऊन लाठ्या-काठ्या खाल्या. जर तुम्ही सीमाप्रश्नासाठी लाठ्या खाल्या आहेत, तर आज तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेला आहेत, त्या खुर्चीवरून महाराष्ट्राचा कर्नाटकने केलेला अपमान तुम्ही पाहिला नसता.
संबंधित बातमी:
10 दिवसात दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन, 81 वर्षाचा योद्धा मैदानात, सीमावादावर आक्रमक भूमिका