(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shambhuraj Desai Sinoli Visit : शंभूराज देसाई उद्या बेळगाव सीमेवरील शिनोळी गावात जाणार, सीमाभागातील वातावरण पुन्हा तापणार?
Shambhuraj Desai Sinoli Visit : कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद निवळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बैठक घेऊन काही तास उलटत नाहीत तोपर्यंत आपण बेळगाव सीमेवर जाणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केलं आहे.
Shambhuraj Desai Sinoli Visit : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर (Maharashtra Karnataka Border Dispute) तात्पुरता पडदा टाकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याची बुधवारी (14 डिसेंबर) दिल्लीत बैठक पार पडली. पण त्यानंतर काही तासांतच महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे बेळगावच्या सीमेला लागूनच असलेल्या शिनोळी (Shinoli) गावात जाणार आहेत. मराठी भाषिकांना आधार देण्यासाठी आपण चाललो असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. अर्थात शंभूराज देसाईंच्या या दौऱ्याची कर्नाटकडून देखील प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्नामुळे निर्माण झालेला वाद निवळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बैठक घेऊन काही तास उलटत नाहीत तोपर्यंत आपण बेळगाव सीमेवर जाणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केलं आहे. बेळगावपासून अगदी जवळ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील शिनोळी गावात ते शुक्रवारी (16 डिसेंबर) जाणार आहेत .
एबीपी माझाने या गावातील लोकांना कोणत्या परिस्थितीत जगावं लागतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कर्नाटकने इथल्या लोकांवर पिढ्यानपिढ्या कसा अत्याचार केला यांचा पाढा वाचला.
नियम पाळणार, पण दौऱ्यामुळे वातावरण तापणार
शंभूराज देसाई बेळगावमध्ये न जाता बेळगाव सीमेवरच्या शिनोळी गावात जाणार आहेत. त्यामुळे एकमेकांच्या सीमांचं उल्लंघन करायचं नाही हा अमित शाहांनी घालून दिलेला नियम ते पाळणार आहेत. पण त्यांच्या या दौऱ्यामुळे सीमाभागातील वातावरण पुन्हा तापणार आहे.
आतापर्यंत काय काय घडलं?
* महाराष्ट्र सरकारने चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली सीमाभागाचा प्रश्न सोडवण्यासाठी समिती गठित करताच कर्नाटकाने कुरापती सुरु केल्या.
* सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांना कर्नाटकाने पाणी सोडलं आणि त्या गावांवर दावा केला.
* सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण अक्कलकोट तालुक्यावर कर्नाटकाने दावा केला.
* बेळगाव जवळ महाराष्ट्रातील वाहनांवर कन्नड रक्षणा वेदिका या संघटनकडून हल्ले करण्यात आले .
* या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची वक्तव्ये आगीत तेल ओतणारी राहिली. पण आपल्या नावाने झालेली ट्वीट आपण केलीच नव्हती असा दावा त्यांनी केला.
शंभूराज देसाईंच्या दौऱ्याला भाजपची संमती?
जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत एकमेकांच्या प्रदेशावर दावे करायचे नाहीत, असं अमित शाहांसोबतच्या बैठकीत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे. मग वर्षानुवर्षं महाराष्ट्राने केलेल्या बेळगाव आणि परिसराच्या मागणीचं काय? याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी शंभूराज देसाई बेळगाव सीमेवरील गावात जात आहेत. अर्थात त्यांच्या या जाण्याला भाजपाची संमती आहे का हे पाहावं लागेल. कारण त्यांच्या या दौऱ्यानंतर कर्नाटकडून देखील प्रतिक्रिया येऊ शकते आणि दोन्ही राज्यांमध्ये झालेला तह विस्कटू शकतो.
VIDEO : Shambhuraj Desai Karnataka : शंभूराज देसाई उद्या सीमाभागात, शिनोळीत घेणार सभा ABP Majha