(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न ; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचा विरोधकांवर निशाणा
Dilip Walse Patil : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा गेल्या काही दिवसांपासून प्रश्न निर्माण झाला आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला.
Dilip Walse Patil : "गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही घटना घडत आहेत. परंतु, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षित आहे. राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, राज्यात महाराष्ट्र पोलिसांकडून योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली जात आहे. भाजपसह अनेक घटकांकडून राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा गेल्या काही दिवसांपासून प्रश्न निर्माण झाला आहे. यावर दिलीप वळसे पाटील यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. ते म्हणाले, "राज्यात कितीही अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी परिस्थिती हाताळण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत. काही राजकीय पक्षांकडून राज्यात नकारात्मक विचार पसरवण्याचं काम केलं जात आहे. परंतु, सर्वच पक्षांनी एकत्र येत आपली भूमिका ठरवली पाहिजे. शिवाय महागाईच्या प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. राज्यात मुलभूत प्रश्नांवर चर्चा होत नाही. परंतु, इतर प्रश्नांवर चर्चा होते. हे योग्य नाही.
राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याबद्दल न्यायालयाकडून महाराष्ट्र पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. यावर बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, "राणांवर राजद्रोहाचा गुन्हा का लावला ते वरील कोर्टोत पटवून देवू. राजद्रोहाचं कलमच राहिलं नाही तर त्याचा गैरवापर होणार नाही. त्यामुळे राजद्रोहाच्या कलमावर केंद्रानेच डेडलाईन ठरवणे गरजेचं आहे."
"घटनेने सर्वांना आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे. परंतु, बोलत असताना कायद्याचं पालन केलं पाहिजे. राज्यात अनेक प्रश्न असताना विरोधकांकडून इतर प्रश्नांवरून महाराष्ट्राची छबी खराब करण्याचं काम केलं जात आहे. सरकारला कितीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरी हे सरकार व्यवस्थितपणे पाच वर्षे आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत बोलताना ते दिलीप वळसे पाटील म्हणाले, "राज ठाकरे यांच्याबाबत औरंगाबाद पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच आहे. कोणीही येणार आणि भोंगे काढायला सांणार, राज्यात हुकुमशाही आहे का? कोणीही धमकी द्यायची आणि सरकारने ते सहन करायचे, हे चालणार नाही, असा इशाराच दिलीप पळसे पाटील यांनी यावेळी दिला.
"प्रत्येकाने काद्याचा आदर करावा. राज्यात अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे सरकारला त्यावर काम करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. शिवाय भोंग्यांबाबत केंद्रानेच धोरण ठरवलं पाहिजे, असेही दिलीप पळसे पाटील यांनी म्हटले आहे.