Hinganghat Case Verdict : शिक्षिकेला पेट्रोलनं पेटवणारा विकेश कोर्टात चिडीचूप; फास्ट ट्रॅक कोर्टात काय घडलं?
Hinganghat Case Verdict : आरोपी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं, हा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला आहे.
Hinganghat Case Verdict : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात आज सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत आरोपी विकेश नगराळेला न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. तसेच उद्या दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालय दोषीच्या शिक्षेवर निर्णय देणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. 3 फेब्रुवारी 2020 रोजी आरोपी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता. या गुन्ह्यात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. या प्रकरणी 426 पानांचं दोषारोपपत्र, 64 सुनावणी, 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे, पीडित तरुणीच्या मृत्यूला 2 वर्ष पूर्ण होताना आज हा निकाल दिला जाणार होता. परंतु, आता आरोपीच्या शिक्षेवर उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सरकारनं विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकमांची नियुक्ती केली होती.
आज कोर्टात काय घडलं?
तीन फेब्रुवारी 2020 रोजी प्राध्यापिका तिच्या कॉलेजला जात असताना आरोपी विकेश नगराळेनं तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळून टाकलं हा खुनाचा आरोप विकेश विरोधात आज सिद्ध झाला. आणि त्याला कोर्टाच्या वतीनं दोषी ठरवण्यात आलं.
त्यानंतर सरकारी पक्षानं न्यायालयाला विनंती केली की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे एखाद्या आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात जेव्हा दोषी ठरवलं जातं, तेव्हा आरोपीला त्याच्या शिक्षेबद्दल युक्तिवाद करण्यासाठी, त्याची शिक्षेबद्दलची काय अपेक्षा आहे? तसेच सरकारी पक्षालाही कोणती शिक्षा मागायची आहे. याबद्दल एक दिवसाचा वेळ दिला जातो.
त्याच अनुषंगानं न्यायालयानं एक दिवसाची वेळ दिली आहे. त्यामुळे दोषी विकेश नगराळेच्या शिक्षेवर उद्या सुनावणी होणार आहे.
उद्या कोर्टात शिक्षेसंदर्भात युक्तिवाद होईल आणि त्यानंतरच न्यायालय खुनाच्या प्रकरणात दोषी सिद्ध झालेल्या विकेश नगराळेला शिक्षा सुनावेल.
दरम्यान आज न्यायालय आरोपी विकेश नगराळे याला शिक्षा सुनावताना विकेश अगदी शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर कुठल्या पद्धतीचे भाव नव्हते. तो एक शब्दही बोलला नाही.
दुसऱ्या बाजूला पीडित प्राध्यापिकेचे आई-वडील आज सकाळपासूनच न्यायालयात उपस्थित होते. मात्र निकाल दिला जात असताना त्यांना दुसऱ्या खोलीत बसवण्यात आलं होतं. मात्र त्यांनी समाधान व्यक्त करत न्याय देवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असं सांगितलं. तसेच, उद्या आम्हाला न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
426 पानांचं दोषारोपपत्र, 29 साक्षीदार, कोर्टाच्या निकालाची प्रतिक्षा
3 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट येथे आरोपी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिका तरुणीवर पेट्रोल टाकून पेटवलं होतं. यांत गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित प्राध्यापिका तरुणीचा उपचारादरम्यान 10 फेब्रुवारी 2020 रोजी मृत्यू झाला होता. या जळीतकांड प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. दोषी विकेश नगराळेविरोधात तब्बल 426 पानांचं दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केलं होतं. या प्रकरणात आतापर्यंत 29 साक्षीदार तपासण्यात आले आहेत.
दरम्यान, एका तरुण शिक्षिकेला रस्त्यावर अशा पद्धतीने जिवंत जाळल्या गेल्यामुळे हिंगणघाट आणि ग्रामीण भागात वातावरण मोठ्या प्रमाणावर बदल्याचे मतही अनेक शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी व्यक्त केले आहे. जळीत हत्याकांडाच्या त्या दुर्दैवी घटनेनंतर महिला आणि मुलींच्या बाबतीत घरातून अनेक बंधनं लादली गेल्याचं त्यांचं मत आहे. एकटे बाहेर जाण्यापासून जास्त वेळ बाहेर राहण्याबद्दल ही निर्बंध असल्याचे महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींचे मत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Wardha HinganGhat Case : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी विकेश नगराळे दोषी; फाशी की जन्मठेप? उद्या निकाल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha