Sugar Factory : विरोधी थोपटे-कोल्हेंचा कारखाना वगळणार, सत्ताधाऱ्यांच्या चार कारखान्यांना मदतीची लॉटरी, सहकार मंत्रालयात हालचालींना वेग
Margin Money Loan : काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि नगरचे विवेक कोल्हे यांच्या कारखान्यांना अनुक्रमे 80 कोटी आणि 125 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार होता. तो निर्णय आता मागे घेण्यात येणार आहे.
मुंबई : केंद्र सरकारकडून मदत देण्यात येणाऱ्या राज्यातील अडचणीतील कारखान्यांच्या यादीतून विरोधी पक्षांच्या दोन कारखान्यांना वगळण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. त्यामध्ये काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) आणि अहमदनगरमधील विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या कारखान्यांचा समावेश आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी या दोन्ही नेत्यांच्या कारखान्यांना मार्जिन मनी लोन देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र लोकसभेनंतर बदललेल्या राजकीय समीकरणानंतर या दोन्ही कारखान्यांना वगळण्यात येत असल्याची माहिती आहे.
राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या NCDC मार्फत 1898 कोटी मार्जिन लोन मंजूर करण्यात आलं होतं. मात्र या 13 साखर कारखान्यांमधून काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांचा राजगड साखर कारखाना तर कोपरगावमधील विवेक कोल्हे यांचा साखर कारखाना वगळण्याची हालचाल सुरु झाल्याची माहिती आहे. ही दोन्हीही साखर कारखाने वगळण्याच्या मागे दोन्ही जिल्ह्यातील बड्या नेत्यांचा दबाव असल्याची सूत्रांची माहिती आहे.
काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला 80 कोटी रुपये तर शंकराव कोल्हे कोपरगाव सहकारी साखर कारखान्याला 125 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र राजकीयदृष्ट्या समीकरण बदलल्यानंतर या दोन्ही कारखान्यांना मदत दिली जाणार नाही.
विरोधी कारखान्यांना मदत करावी, शरद पवारांची मागणी
राज्यातील सत्ताधाऱ्यांशी संबंधित कारखान्यांना मदत दिली जाते, पण विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या कारखान्यांना मदत दिली जात नाही असा सहकार क्षेत्रातून तक्रारीचा सूर आहे. याच मुद्द्यावरती शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व कारखान्यांना मदत करण्याची विनंती केल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र या दोन कारखान्यांना मदत देण्याऐवजी सत्ताधारी पक्षाच्या इतर चार कारखान्यांना मदत दिली जाणार आहे.
संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हे यांच्या कारखान्याव्यतिरिक्त कोणत्या कारखान्यांना मदत करण्यात येणार आहे त्याची यादी खालीलप्रमाणे,
अजित पवार गटाशी संबंधित कारखाने
- लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखाना (बीड)- 104 कोटी
- किसनवीर (सातारा)- 305 कोटी
- किसनवीर (खंडाळा)- 150 कोटी
- लोकनेते मारोतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना(नेवासा) - 150 कोटी
- अगस्ती (अहमदनगर) - 100 कोटी
- अंबाजोगाई (बीड)- 80 कोटी
- शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा)- 110 कोटी
भाजपशी संबंधित कारखाने
- संत दामाजी(मंगळवेढा) - 100 कोटी,
- वृद्धेश्वर (पाथर्डी)- 99 कोटी
- तात्यासाहेब कोरे वारणानगर (कोल्हापूर) -350 कोटी
- बसवराज पाटील यांचा विठ्ठलसाई (धाराशिव) -100 कोटी
ही बातमी वाचा: