Assembly Election Result | कणकवलीमध्ये भाजपच्या नितेश राणेंचा विजय, शिवसेनेला धक्का
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यामुळे कणकवली मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांच लक्ष लागलं होतं.
सिंधुदुर्ग : शिवसेना आणि राणेंसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात राणेंनी बाजी मारली आहे. नितेश राणेंचा याठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजय झाला असून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. नितेश राणे यांना 27 हजारहून अधिक मताधिक्य मिळालं आहे. शिवसेना-भाजपची युती असताही शिवसेनेने नितेश राणेंविरोधात सुधीर सावंत यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे शिवसेनेने युतीधर्म पाळला नाही, असं नारायण राणेंनी म्हटलं होतं.
निवडणुकीच्या प्रचारदरम्यान शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यामुळे कणकवली मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. नितेश राणेंना पराभूत करण्याच्या उद्देशानेच शिवसेनेने त्याठिकाणी प्रचार केला होता. स्वत: उद्धव ठाकरे यांनी कणकवलीत प्रचार सभा घेत नारायण राणेंवर हल्लाबोल केला होता.
भाजप-शिवसेनेची युती आहे, मात्र तरीही कणकवलीमध्ये भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी शिवसेनेनं उमेदवार उभा केला आहे. भाजपने इतर कुणाला उमेदवारी दिली असती, तर मी त्याचं समर्थन केलं असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.
नारायण राणे ज्या पक्षात जातील त्या पक्षाची वाट लावतील. चोर मित्राच्या घरात शिरत असताना मी शांत कसा बसू शकतो. कारण पाठीत वार करणारे माझ्या मित्रपक्षांकडेही नकोत, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला. मान वाकवणारा स्वाभिमान काय कामाचा, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राणेंवर टीकास्त्र सोडलं होतं. मात्र निवडणुकीदरम्यान शिवसेनेविरोधात कोणतीही टीका करणार नाही असं राणे पितापुत्रांनी जाहीर केलं आहे.