(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Congress : राज्यात काँग्रेसची पडझड, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; नाना पटोलेंचा दिल्लीत तळ
Maharashtra Congress : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला असला तरी अजूनही पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी हालचाल सुरू नसल्याचं दिसतंय.
मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेससह महाविकास आघाडीचा दारून पराभव झाल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे. या पराभवाला ईव्हीएम जसं जबाबदार आहे तसं राज्यातील पक्षाचं नेतृत्वही जबाबदार असल्याची टीका करत त्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी होताना पाहायला मिळतेय. गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत.
काँग्रेस... स्वातंत्र्यानंतर अनेक दशकं देशावरती राज्य करणारा पक्ष. मात्र या पक्षाला उतरती कळा लागलीय. देशात भाजपच सरकार आल्यानंतर अनेक राज्य हातातून जाऊ लागली आहेत. सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्र काँग्रेसला मात्र चांगलाच धक्का या निवडणुकीत बसलाय. एवढा धक्का बसलाय की मोदी लाटेत ही एवढी वाईट अवस्था या पक्षाची झाली नव्हती. मात्र आता आरोपांच्या एकमेकांवर फैरी झाडतान नेते पाहायला मिळत आहे.
या लाटेमध्ये जागा वाटपावरती ही अनेक नेत्यांनी बोट ठेवलेलं आहे. प्रत्येक मोठ्या नेत्याने आपला जिल्हा, आपलं घर सोडलं तर बाकीचा विचार केला नाही असा आरोपही भाई जगतापांनी यावेळी केला. राज्यात आणि मुंबईमध्ये ज्या पारंपरिक काँग्रेसच्या जागा आहेत त्या जागा मित्र पक्षांना वाटल्या गेल्या त्यामुळेही पक्षाचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे कधी इतिहास लिहिला जाईल तर हा काळा इतिहास म्हणून नोंद घेतली जाईल असा त्रागाही भाई जगताप यांनी केला.
सन 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाठ असतानाही पक्षाची एवढी पडझड झाली नव्हती. एवढंच नाही तर पहिल्या फळीतल्या अनेक नेत्यांचाही यावेळी मोठा दारुण पराभव झालाय. मुख्यमंत्री पदाचे दावेदार बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण सोबतच यशोमती ठाकूर यांचा ही पराभव झालाय.
निवडणुकीचा निकाल हातात येऊन दोन दिवस झालेत. मात्र अद्यापही या निवडणुकीची कारणमिमांसा काँग्रेसने केलेली नाही. याऊलट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यामुळे नाना पटोले आणि राहुल गांधी यांच्या बैठकीत काय होतंय ते पाहणं महत्त्वाचं राहील. झालेल्या निवडणुकीचा निकाल स्वीकारून काँग्रेस पुन्हा कामाला लागणार की पक्षांतर्गत काही फेरबदल करणार हे पाहणं महत्वाचं राहणार आहे.