भाटघर 100 टक्के, जायकवाडी किती? महाराष्ट्राचा विभागनिहाय पाणीसाठा किती झालाय? वाचा
राज्यात जोरदार पाऊस सुरु असून धरणसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. अनेक धरणे १०० टक्के भरलीयेत. काही अजूनही शुन्यावर आहेत. कुठे सुरुये विसर्ग? कुठे भरतायत धरणं ? वाचा
Dam Water Storage: राज्यात सध्या सर्व दूर जोरदार पाऊस (Rain) सुरू झाला आहे गेल्या काही दिवसांपासून रिमझिम व हलक्या सरींमुळे धरण साठ्यातील वाढ काहीशी मंदावली होती पण गेल्या दोन दिवसांपासून पाऊस वाढला आहे. परिणामी राज्यातील धरण साठ्यातही लक्षणीय वाढ होत आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये आज सरासरी 69.32% उपयुक्त पाणीसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या जलसाठ्यात 7.56% ची वाढ नोंदविण्यात आली आहे.
कोकणातील बहुतांश धरणे भरली, विसर्ग ही सुरू
कोकण विभागातील बहुतांश धरणांनी 90 टक्क्यांची मर्यादा ओलांडली असून अनेक धरणे ओवर फ्लो झाल्याचे चित्र आहे. भातसा सूर्या धामणी अप्पर वैतरणा या धरणांमधून विसर्ग सुरू असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. ठाण्यातील बहुतांश धरणे ही 90 टक्क्यांच्या पुढे गेली असून बारावी 97.63%, भातसा 93.61%, निम्न चोंडे 88.28%, मोडक सागर 96.24%, तानसा 97.54% भरले आहे त्यामुळे ठाणेकरांची तहान यंदा भागणार असल्याचे दिसते.
मराठवाड्याचा सरासरी पाणीसाठा 28.90%
मराठवाड्यातील लघु मध्यम व मोठ्या धरणांमध्ये आज केवळ 28.90% उपयुक्त पाण्यासाठी शिल्लक आहे. मागील वर्षी तो 31.51% एवढा होता. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्याचा धरणसाठा हा इतर विभागांपेक्षा सर्वात कमी आहे. मराठवाडा विभागातील अनेक धरणे अजूनही शून्यावर आहेत. विभागातील सर्वात मोठे जायकवाडी धरण आता 31.34% भरलं आहे. मागील दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे धरण साठ्यात वाढ होत आहे.
बीड जिल्ह्यातील सर्वाधिक जलक्षमतेचे माजलगाव धरण अजूनही शून्यावर आहे. मांजरा धरण 13.45% भरले आहे. सिद्धेश्वर 59.46%, येलदरी 36.20%, विष्णुपुरी 83.65%, निम्नमनार 84.57%, धाराशिवचे निम्नतेरणा 31.21% सीना कोळेगाव शून्यावर आहे.
नाशिक विभागात काय स्थिती?
नाशिक आणि नगर मधील एकूण 537 धरणांमध्ये आज सरासरी 63.53% पाणीसाठा आहे. नाशिकच्या दारणा 87.58% गंगापूर 86.68%आणि गिरणा 45.38% एवढा पाणीसाठा असून नगरमधील धरणासाठ्यात वाढ होत आहे. भंडारदरा 96.78%, मुळा ८६.२७% आहे.
पुणे विभागात जोरदार पाऊस, धरणे किती भरली?
पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजचा उपयुक्त जलसाठा 83.91% आहे. पुण्याचे भाटघर आंध्रा धरण शंभर टक्के भरलं असून चाकसमन 98.93%, पवना 98.02%, खडकवासला 79.11%, डिंभे 92.40, पानशेत 98.83% भरला आहे. तर सातारा सांगली आणि कोल्हापूर मधील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे.
कोल्हापूर मधील दूधगंगा 86% आणि राधानगरी 94.76% झाली आहेत. साताऱ्यातील कोयना धरण 85.22% तर सांगलीतील वारणा धरण 85.33% झाले आहे.
नागपूर विभागात 78.66%
नागपूर विभागातील 383 धरणांमध्ये आज 78.66% पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याचवेळी हा साठा 72.20% एवढा होता. पंच तोतलाडोह धरणामध्ये 93.09% पाणीसाठा शिल्लक आहे. गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि वर्धा येथील पाण्यासाठी आता हळूहळू वाढ होत आहे.
अमरावती विभाग
अमरावती विभागातील 264 धरणांमध्ये 65.13% पाणीसाठा झालाय. मागील वर्षीच्या तुलनेत एका टक्क्याची वाढ या विभागात दिसून येते. जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार अमरावतीच्या उर्ध्व वर्धा धरणात 81.54% तर अकोल्याच्या काटेपूर्णा धरणात 91.12% जलसाठा झाला आहे. बुलढाण्यात खडकपूर्णा धरण अजूनही शून्यावर असून पेनटाकळी धरणात 19.83% पाणीसाठा शिल्लक आहे.
हेही वाचा: