Maharashtra Coronavirus Lockdown LIVE Updates : देशात गेल्या 24 तासांत 1.52 लाख नवे रुग्ण, 3128 कोरोनाबाधितांचा मृत्यू
Maharashtra Covid 19 Cases Lockdown LIVE Updates : राज्यातील कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊन संबंधित अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये
LIVE
Background
मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या बघता 10 जूनपर्यंत 'जैसे थे' परिस्थिती ठेवावी अशी चर्चा गुरुवारी (27 मे) मंत्रिमंडळ बैठकीत झाली होती. काही जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात वाढत असलेली रुग्णसंख्या बघता आता असलेले निर्बंध तसेच ठेवावे असे मत आरोग्य विभागाने मांडले होते. पण काही विभागांनी निर्बंध शिथिल करावे अशीही भूमिका मांडली आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हाबंदी ही 10 जूननंतरच उठण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 जूनपासून शासकीय आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेने सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
महाराष्ट्रात शनिवारी 20,295 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात रोज कमी होणाऱ्या रुग्णसंख्या पाहता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यात आज 20,295 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 31 हजार 964 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता रिकव्हरी रेट 93.46 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज 443 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरी भागात कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहेत.
राज्यात सध्या सहा जिल्ह्यांमध्ये नवीन कोरोना रुग्णसंख्या हजारच्या पुढे नोंद होत आहे. यात मुंबई 1038, अहमदनगर 1246, पुणे 1259, सातारा 2177, कोल्हापूर 1611 आणि सांगली 1063 असा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यात काही बंधनं काढून टाकली जाणार
पुणे जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुविधांवर असलेली बंधनं काढून टाकली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याने काही निर्बंध उठवण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुविधांवर असलेली बंधनं काढून टाकली जाणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. रेड झोनमध्ये असलेल्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. सध्या पुण्यातील परिस्थिती समाधानकारक असल्याचे टोपे म्हणाले. परंतु, डेथ रेशो आणि पॉझिटीव्हीटी रेट कमी झालेला नाही. संपुर्ण महाराष्ट्रात ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगी शास्त्रीय पद्धतीने वाढवण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी हाय रिस्क एरिया आहे तिथेच ट्रेसिंग व्हायला हवे. उगीच कुठेही ट्रेसिंग करुन पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, असं दाखवता कामा नये.
संस्थात्मक विलगीकरण वाढवण्यात येणार
होम क्वारंटाईन कमी करुन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन वाढवायला हवे, अशी सगळ्या लोकप्रतिनिधींची आग्रही मागणी आहे. बऱ्याचवेळा होम क्वारंटाईन असलेला रुग्ण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे अनेकांनी ही मागणी केली होती. प्रत्येक हॉस्पिटल्सची बिलं तपासण्यासाठी डेडिकेटेड ऑडिटर देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. अनेक रुग्णालयांकडून अव्वाच्यासव्वा बिल आकारली जात आहेत. ऑडिटरने हे रोखावे ही अपेक्षा आहे, असं टोपे म्हणाले.
निर्बंधांमधून सूट देण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाचा
अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसीसचे रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, अनेक मोठी हॉस्पिटल्स सरकारी योजना त्यांच्याकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांना लागू करत नाहीत. त्या कराव्यात यासाठी चॅरिटी कमिशनरांना सूचित करण्यात आलं आहे. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी स्वतःच्या स्टाफला स्वतःच्या खर्चाने लस द्यावी अशा सूचना औद्योगिक क्षेत्रात देण्यात आल्या आहेत. अनेक खाजगी हॉस्पिटल्स लसीसाठी जास्तीची रक्कम वसूल करत आहेत. प्रशासनाला त्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन पंधरा दिवसांसाठी वाढवण्यात येईल. परंतु, निर्बंधांमधून सूट देण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाचा असेल, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
देशात गेल्या 24 तासांत 1.52 लाख नवे रुग्ण, 3128 कोरोनाबाधितांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासांत देशामध्ये 152734 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 3128 नागरिकांना कोरोनामुळं प्राण गमवावे लागले. नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेच मागील दिवसभरात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा जास्त होता. तब्बल 238000 रुग्ण कोरोनातून बरे झाले. याआधी शनिवारी देशात एकूण 165553 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ही एकंदर आकडेवारी पाहता काही अंशी नव्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचं कळत आहे.
जाणून घ्या; देशातील आजची कोरोना स्थिती
देशातील आजची कोरोना स्थिती :
- एकूण कोरोना रुग्ण - 2 कोटी 80 लाख 47 हजार 534
- कोरोना मुक्त झालेले रुग्ण - 2 कोटी 56 लाख 342
- एकूण सक्रिय रुग्ण - 20 लाख 26 हजार
- एकूण मृत्यू - 3 लाख 29 हजार 100
Maharashtra Corona : एकाच जिल्ह्यातील 8 हजार मुलं कोरोनाच्या विळख्यात
Maharashtra Corona : देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अद्याप सुरुच आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असली तरी मृतांचा आकडा मात्र धडकी भरवणार आहे. अशातच कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून मग ती पहिली कोरोनाची लाट असो वा दुसरी. सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात पाहायला मिळाला. अचानक आलेल्या कोरोना संकटामध्ये झपाट्यानं वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या, वाढता मृतांचा आकडा, ऑक्सिजनसह बेडची कमतरता यासारख्या आरोग्य यंत्रणांतील त्रुटींचाही सामना महाराष्ट्रानं केला आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या एकूण आकड्यापैकी सर्वाधिक आकडाही महाराष्ट्राचाच आहे.
कोरोना नियमांचे पालन करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यात नवीन ऑक्सिजनचे प्लांट आपण उभे करत आहोत. यासाठी 3 महिने ते 18 महिन्यांचा कालावधी लागेल, तोपर्यंत आपल्याला अतिशय सावधपणे पुढे जावं लागत आहे. राज्यातील नागरिकांनी आतापर्यंत केलं तसंच सहकार्य पुढे करावं, कोराना प्रतिबंधक नियमांचे पालन करावं, असं आवाहनमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सुविधांची उपलब्धता, त्याची सध्याची स्थिती याचीही माहिती दिली.
गाव कोरोनामुक्त करणाऱ्या सरपंचांचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करुन देशासमोर उत्तम उदाहरण घालून देऊया, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी रविवारी (30) मे सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधून कोरोना, लॉकडाऊन, च्रकीवादळ यासह विविध मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी चांगली कामगिरी करुन कोरोनामुक्त गाव करणाऱ्या संरपंचांचे कौतुक देखील केलं.
आपण राज्यात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी', 'मी जबाबदार', अशी वेगवेगळी अभियानं यशस्वीरित्या राबवली. आता शहर आणि गावांनी ठरवलं तर आपण कोरोना मुक्त गाव आणि कोरोनामुक्त शहराची संकल्पना यशस्वीरित्या राबवू शकू. प्रत्येक घर, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर कोरोनामुक्त झालं तर राज्य कोरोनामुक्त होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आपण चांगला मुकाबला केला असला तरी कोविडचं आव्हान कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करुया," असं आवाहन त्यांनी केलं. तसंच मुख्यमंत्र्यांनी आपल्या संबोधनात गाव कोरोनामुक्त केलेल्या पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख आणि कोमलताई करपे या तीन सरपंचांच्या कामाचा गौरव केला.