(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Coronavirus : कोरोनाचा कहर थांबेना! आज सर्वाधिक 63,729 रुग्णांचे निदान, 45,335 जणांना डिस्चार्ज
Maharashtra Coronavirus : आज राज्यात सर्वाधिक 63,729 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 45,335 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 30,04,391 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.12 एवढे झाले आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रकोप थांबायचं नाव घेत नाहीय. आज राज्यात सर्वाधिक 63,729 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 45,335 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 30,04,391 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.12 एवढे झाले आहे.
राज्यात आज 398 कोरोना बाधित रुग्णांच्या मत्युंची नोंद झाली असून राज्यातील मत्युदर 1.61 एवढा झाला आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३३,०८,८७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७,०३,५८४ (१५.८९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,१४,१८१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,168 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,३८,०३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज 8803 रुग्णांची नोंद झाली आहे. तर ठाणे मंडळात 17,635 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुणे मनपा अंतर्गत 5437 नवीन रुग्णांची तर पिंपरी चिंचवड महापालिकेत 2526 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात आज जिल्ह्यात तब्बल दीड हजार लोकांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात 883 कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार
सोलापूर जिल्ह्यात आज कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळाला आहे. आज जिल्ह्यात तब्बल दीड हजार लोकांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. एका दिवसात तब्बल 1500 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 24 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 371 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 7 जणांचा मृत्यू झाला असून ग्रामीण भागात 1129 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आणि 17 जणांचा मृत्यू झाला आहे.